हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माणुसकीला काळिंबा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली असून जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना खांबांना बांधून मारहाण केल्याचा प्रकार घडला. यामध्ये चार महिला आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. याप्रकरणी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहा करण्यात आली आहे. तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द या गावात ही घटना घडली असून गावात भानामती करत असल्याच्या संशयावरून चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत पीडितांची सोडवणूक केली. पोलिसांनी आतापर्यंत एकूण बारा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेबाबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. जादू टोण्यासारख्या काल्पनिक घटनांना बळी पडून अशा प्रकारचे कृत्य करणे हे निंदनीय आहे. अशा घटनांबाबत आपण अनेकवेळा विधानसभेत चर्चा केली जाते. मात्र, अशा घटनांना कायमस्वरूपी बंदी घालणे गरजेची आहे. त्यावर कडक स्वरूपात कायदे करणे गरजेचे आहे. अजूनही ग्रामीण भागात गैरसमजुती आहेत. त्या दूर होणे गरजेच्या आहेत. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत अधिकाऱ्याना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहे.