सुरेश भट यांच्या आठवणीत रमताना…!! – समीर गायकवाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सुरेश भट यांची ओळख गझलकार म्हणून आहे. आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या गझला अधिराज्य करतात. काळाच्या ओघात माणसं आपल्यातून नाहीशी झाली तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या आठवणी कायमच अजरामर असतात. समीर गायकवाड यांनी ५ वर्षांपूर्वी लिहिलेला सुरेश भट यांच्या आयुष्यातील किश्श्यांचा प्रवास आज त्यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त रसिक वाचकांना उपलब्ध करुन देत आहोत.

अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिकत असतांना सुरेश भट विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा एक दरारा होता. त्या काळात अमरावती शहरात खाजगी मथुरादास बस सर्व्हिस होती. कॉलेजची मुले-मुली या बसने जायचे-यायचे. एकदा पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाशात काळे ढग भरून आले होते. बसमध्ये मुली बसल्या होत्या. भटांच्या भोवती मित्रांचा घोळका. मुलींकडे पाहून मित्रांनी कवीवर्याच्या कवित्त्वालाच आव्हान दिले. ‘खरा कवी असशील, तर या सिच्युएशनवर कविता करून दाखव’ ! आणि –      ‘काळ्या, काळ्या मेघांमधुनी ऐसी चमकली बिजली,
जशी काळ्या केसांमधुनी पाठ तुझी मज गोरी दिसली !’
ही कविता अवतीर्ण झाली आणि बसमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. या मनोरंजक आणि तात्काळ सेवेसारख्या तात्काळ कविता करतांनाच –
‘हरवले आयुष्य माझे राहिले हे भास
झगमगे शून्यात माझी आंधळी आरास
व्यर्थ हा रसरुपगंधाचा तुझा अभिसार
वेचूनि घे तू वार्यागवरी माझे अभागी श्वास.’
किंवा
‘पाठ दाखवून अशी दुःख कधी टळते का?
अन्‌ डोळे मिटल्यावर दैव दूर पळते का?
दाण्याचे रडणे कधी या जात्याला कळते का?’
असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या दर्जेदार कवितांची आरासही ते लावीत असत. महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालेली ही काव्याची आराधना त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवली. कवितेसाठी त्यांनी आपल्या जगण्याचे मोल चुकविले. विद्यार्थ्यांचा घोळका आणि सुरेश भट असे समीकरणच होते. कारण वर्गखोलीत बसणे त्यांच्या सिलॅबसमध्येच नव्हते आणि दुसरे म्हणजे कॉलेजच्या परिसरातील झाडाखाली झडणारी त्यांची इन्स्टंट कवितांची मैफिल. मराठी वाङ्‌मय मंडळाचे ते अध्यक्ष होते. वाङ्‌मय मंडळाच्या कार्यक्रमात त्यांचे सवाल जवाब चालायचे. या सर्व गोष्टी आठवायचे कारण म्हणजे परवाची एक आठवण …
पुर्वी रेडीओ सर्रास ऐकला जायचा, त्यानंतर टेपरेकॉर्डर आले, म्युझिक सिस्टीम आल्या. हळूहळू जुने जाऊन नवीन आले. जोडीला आता इंटरनेट आहे, यु ट्यूब आहे. माध्यम बदललीत पण कुणा रसिकाचे गाणी ऐकणे बंद झाले नाही अन कधी होणारही नाही. यु ट्यूब किंवा ‘गाना डॉट कॉम’ सारखी साईट ट्युन करून आपले काम सोपं करणारे माझ्यासारखे अनेक जीव पृथ्वीतलावर आहेत. काही दिवसांपूर्वी यू ट्यूबला ‘तरुण आहे रात्र …’ वरती लोकांच्या कॉमेंटस वाचल्या. त्यात एका रसिकाने या गाण्याच्या अनुषंगाने अवधूत गुप्तेंच्या ‘सारेगामा’चा उल्लेख केला होता. ती वाचून सारेगामा धुंढाळून काढण्याची गरज पडलीच नाही कारण त्यात नोंद केलेला सारेगामाचा एपिसोड पाहिला असल्याने इतकी महत्वाची बाब आपण कसं काय विसरलो असंच वाटू लागलं …
आणि परवा रात्री झी मराठी वाहिनीवर नेमकं हेच गाणं आशाजींच्या कर्णमधुर आवाजात ऐकलं आणि डोळ्यात पाणी आलं. या गझलेमागे एक करुण कथा आहे असं जर मनात गृहीत धरून हे गाणं ऐकलं तर या गझलेचे भाव पूर्णतः बदलून जातात. ती केवळ शृंगारिक रचना न राहता एक आर्त करूण शोकगाथा बनून जाते, जी आपले हृदय पिळवटून टाकते…खरंच ही करूण, दुःखद घटनेवरची गझल आहे का ? नक्की काहीच सांगता येत नाही, पण अवधूत गुप्ते बोलल्याप्रमाणे इंग्रजी कवितांचा धांडोळा घेतला तर अशाच प्रसंगावर बेतलेल्या एका करूण कवितेचे शब्द डोळ्यापुढून हटत नाहीत. पण त्यात कवीने घडलेली घटना सरळस्पष्ट कथन केलीय. तो कवी म्हणजे लॉर्ड टेनीसन, एक उत्तुंग प्रतिभेचा आशयसंपन्न कवितांचा हळव्या मनाचा कवी.

Home they brought her warrior dead:
She nor swooned, nor uttered cry:
All her maidens, watching, said,
‘She must weep or she will die.
Rose a nurse of ninety years,
Set his child upon her knee–
Like summer tempest came her tears–
‘Sweet my child, I live for thee.’

युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या एका वीर जवानाचा मृतदेह घरी आणलेला आहे. त्याच्या पाठीमागे आता फक्त त्याची तरूण पत्नी व चिमुरडे मूल राहिले आहे. आपल्या पतीच्या निष्प्राण देहाकडे विमनस्क अवस्थेत शांत बसलेली पत्नी. तिने तिचा अश्रुंचा बांध थांबवलेला आहे, ती ओठ मिटून बसली आहे काहीच बोलत नाहीये. तिने आपल्या भावनांचा बांध खुला करावा, मनातलं आभाळ रितं करावं म्हणून तिचे सगळे स्नेहीजन एका वेगळ्या भ्रांतेत आहेत. पण काही केल्या ती निश्चल अवस्थेतून बाहेर येत नाही हे लक्षात आल्यावर एक वृद्धा उठते आणि तिच्या तान्हुल्या बाळाला तिच्या मांडीवर ठेवते. त्या बाळाच्या हुंदक्याने तिची समाधीतल्लीनता भंगते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची वाट मोकळी होते…

कविता अर्धीच वाचून झाली तरी डोळ्याला पाणी येते. मन सुन्न होते. या कवितेचा अर्थ आणि आपल्या ‘तरुण आहे रात्र अजुनी’ या भट सरांच्या कवितेचा अन्वयार्थ लावण्याचा मोह मनाला होतोच. त्याना जाणवलेले करुण, दुःखद प्रसंगदेखील असे काही काव्यबद्ध केले आहेत की त्याला कुठेच तोड नाही. ही रचनाही त्यापैकीच एक होय…
आयुष्यातल्या एका अल्वार वळणावर ‘तो’ तिची साथ सोडून गेला आहे आणि त्याचे कलेवर घरी आणलेलं आहे.ते दृश्य बघून तिला काही कळतच नाहीये, ती दिग्मूढ होऊन गेलीय आणि नुसते त्याच्याकडे बघत बसलीय. रात्र उलटत चाललीय आणि हा सहवास कुठे तरी संपुष्टात येणार याची पुसटशी जाणीव तिला झालेली आहे. तिच्या मनात अशा वेळेस भावभावनांचे कोणते कल्लोळ उमटत असतील यांचे एक अप्रतिम काव्यचित्र म्हणजे ही रचना होय.

‘तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?’
रात्र नुकतीच झाली आहे, ती तरुण आहे (आणि तो देखील ). ‘प्रेमाच्या या हृदयीचे त्या हृदयी होण्याची’ ही वेळ असूनही तु असा निजलेला आहेस. खरे तर आपलं फुलासारखं नाजूक प्रेम तु माझ्या केसात माळण्याचं सोडून तु इतक्यातच त्या कुशीवर वळला आहेस. तु असं का केलं आहेस. ही काय जाण्याची वेळ आहे का असं तिला सुचवायचं आहे.

‘अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?’
मला आठवतं की, तुझं प्रदीप्त धगधगतं मन तू असंच माझ्या डोळ्याच्या पारयात हलकेच रितं करायचास अन चंद्रासारखा शीतल होऊन जायचास. एक शब्दही न बोलता सारं माझ्या कानात हळूच ओठांनी स्पर्शून सांगून जायचास. आपल्या उत्कट प्रेमाला साक्ष असणारया या भव्य अंधारलेल्या दिगंतातल्या तारकांच्या त्या दीपमाला अजूनही तेवत आहेत, त्यांनाही अजून आपल्या मिलनाची ओढ आहे. एव्हढेच नव्हे तर मी देखील अजून तुझ्यावरील आसक्त भावनेत तग धरून आहे. ( नाहीतर मी देखील विझले असते ) पण तूच असा दगा का दिलास बरं ? का तू माझ्याशी प्रतारणा करून निघून गेला आहेस ? तुझ्या हृदयातला प्रेमाचा ध्रुवतारा असा कसा निमाला?
‘सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?’
तू हे जे काही केलं आहेस ते एकवेळ मी मनाच्या समजूतीसाठी स्वतःला काहीतरी सांगेन पण आपल्या प्रेमाला सोबती असेलेल हे कोजागिरीचं टिपूर चांदणं जे मोठ्या आशेनं माझ्याकडे बघतंय त्याला आता काय सांगू हा प्रश्न पडलाय. त्यांना पाहून सवयीने आपसूक माझ्या मनातल्या गुलबक्षीच्या फुलाच्या पाकळ्या आपसूकच उमलतात त्यांचं मी काय करू आणि तु तर असं स्वतःला मिटून घेऊन ( अज्ञाताच्या अनंत प्रवासाला ) निघून गेला आहेस. अगदी हृदय पिळवटून जाईल असं हे हळवे रुदन आहे….
‘बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?’
आसमंतातल्या तारकाना मी डोळ्याच्या पापण्याआड करून त्याकडे डोळेझाक करू शकते पण तुझ्यामाझ्या सवयीचा झालेला पश्चिमेचा हा अवखळ वारा जो आपल्या देहाला थरथरता स्पर्श करूनच पुढं जातो. त्याला या स्पर्शाचा आभाळभर कैफ चढला आहे, तो देखील तुझ्याबद्दल विचारतोय त्याला काय सांगावे काही कळत नाही. आपण दोघे एकमेकाच्या पाशात विसावलो की खिडकीतून येणारा रातराणीचा बेधुंद करणारा गंध आपल्या भोवती नजाकतीने पिंगा घालत बसायचा. त्याला आपली सवय झाली होती आणि मला त्याच्या त्या नशील्या गंधाची ! पण तु आता जाताना रातराणीचा गंध तुझ्यासवे नेला आहेस की काय असे वाटावे इतके त्या रातराणीने स्वतःला गंधबंधित करून मिटवून टाकले आहे, ती आता खिडकीतून डोकावत नाही. मला तर काहीच सुचत नाही ( आता तूच ते काय सांग ) असं विचारत ती तिची कैफियत सुरु ठेवते…

‘उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यातसारखा पण कोरडा उरलास का रे ?’
शेवटच्या पंक्तीत सुरेश भटांनी कमाल केलीय. अमृत म्हणजे अमर होण्यासाठी देवतांनी प्राशन केलेले पेय होय. तो जरी असा (निश्चल) बनून राहिला असला म्हणून काय झालं, तिच्या हृदयात प्रेमाच्या लाटा या उसळत आहेत त्या सदैव अखंडीतपणे उसळत राहतील याची तिला खात्री आहे. पण तिला खंत आहे की, या धुंद प्रेमाच्या लाटा उसळत असताना त्याची अनुभूती घेण्यासाठी तो मात्र सचेत नाही. तो किनारया सारखा कोरडा झालाय. पण म्हणून काय झालं, लाट ही शेवटपर्यंत त्या किनारयाकडे येतच राहणार अन त्याच्या पायाला स्पर्शून आपले अमर प्रेमगीत त्याच धुंदीने गात राहणार. इतकी ती तिच्या प्रेमावर फिदा आहे आणि त्यावर जगत राहणार आहे. पण त्यानं असं का वागावं, त्यानं असं ( अकाली ) विझून जावं ? याची तिच्या मनाला पोखरणारी खंत आहे ती तिला काही केल्या गप्प बसू देत नाहीये….

टेनिसनची कविता उघड उघड त्या दुःखद घटनेचे कथन करते पण सुरेश भटांची ही हळवी गझल प्रत्येक कडव्यात प्रगल्भ होत जाणारया प्रेमाची आरसपानी कथा उलगडत जाते. या कवितेमागील नेमकी पार्श्वभूमी अशीच आहे का याला मात्र त्यांनी कधी दुजोरा दिला नाही मात्र त्याबरोबरच त्यांनी या गझलेमागील नक्की भावबिंदू कोणते हे देखील सांगितले नाही. पण त्यांच्या जिवलगाला म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांना मात्र याविषयी सांगतले असावे त्यामुळेच की काय त्यांनी बागेश्री रागात ही गझल आर्त अशा सुरात गुंफली असावी. आशाताईंनी देखील ही करूण गझल अशी काही गायली आहे की आपल्या पतीच्या कलेवाराशेजारी बसून शोक करणारया त्या अनामिक स्त्रीच्या देहात परकाया प्रवेशाची जाणीव व्हावी. वाद्यवृन्दात काळजाची कळ छेडणारी व्हायोलीन वाजत राहते अन मधून वाजत राहणारे बासरीचे स्वर कानावर पडत राहतात अन रसिक त्या गझलेत हरखून जातो….

भावगीतांचा सुवर्णकाळ जेंव्हा लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता तेंव्हा हे भावगीत अनेकांच्या ओठी होते, क्षणासाठी हे करूण पार्श्वभूमीवर लिहिलेले नाही असे जरी ग्राह्य धरले तरी त्यातील अप्रतिम धुंद शृंगाररस मनाला चिंब करून जातो. आजच्या पिढीसाठी नुकत्याच येऊन गेलेल्या ‘अनवट’ चित्रपटात पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याच संगीतात पण नव्या रुपात शंकर एहसान आणि लॉय यांनी हे गाणं सादर केलं आहे. त्यात गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात स्वरबद्ध झालं आहे. असं हे दुहेरी तलवारीच्या पात्यासारखं पण हळवं भावविभोर काव्य आहे. ‘लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते’ हे कविवर्य सुरेश भटांचे म्हणणे या गीतातून जिवंत होते..….

प्रेमाला अपेक्षित अशी मिलनाची घडी असो वा अकस्मात आलेली विरहाची घडी असो हे गाणं मनावर गारुड करून जातं की मेमरी रीइंडेक्स न करता देखील याचे शब्द स्मृतीकोशात जतन होऊन जातात. एक अविस्मरणीय गझल इतकी सुंदर अनुभूती देऊन जाते की आपले जगणे सुंदर होऊन जाते…

सुरेश भट हे मराठीतील एक उत्तुंग प्रतिभेचे अभिजात देणगी लाभलेले कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला त्यामुळेच त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. असं सांगितलं जातं की, त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत….
‘फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर?
दानही करशील तू, पण मी असा आहे कलंदर.’
आपल्या कलंदरपणाची प्रांजळ कबुली देणारे कविश्रेष्ठ सुरेश भटच असू शकतात ! ‘उषःकाल होता, होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ अशा शब्दांनी निद्रीस्त समाजमनाला चेतविणारे, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधीके जरा जपून जा तुझ्या घरी’ हा नटखट भाव व्यक्त करणारे, ‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग’ ही मलमली आणि नादमधुर गीते लिहिणारया सुरेश भटांनी आपल्या काव्याने संपूर्ण मराठी मनाला मोहिनी घातली. जवळपास पाच दशके ते मराठी मनावर अधिराज्य करीत आहेत. सात दशकांच्या त्यांच्या जीवन प्रवासात आयुष्याचे अनेक रंग पाहत ‘रंग माझा वेगळा’ असं सांगणारया भटांच्या व्यक्त्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. प्रतिभासंपन्न कवी, जिंदादिल मित्र, बेधडक व्यक्ती आणि आपल्याच कैफात जगणारी ती वल्ली होती.

१५ एप्रिल १९३२ ला डॉं. श्रीधर भट यांच्या सुखवस्तु कुटुंबातला सुरेश भटांचा जन्म. वडील फॉरेन रीटर्न डॉक्टर, आई स्व. शांताबाई या त्या काळातल्या पुणेरी पदवीधर,शिवाय त्यांना कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. अशी प्रतिष्ठित कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या घरात कवी सुरेश भट हे तसे मिसफिटच व्यक्त्तिमत्व होते. कारण त्यांच्या प्रतिष्ठेच्या चौकटी वेगळ्या आणि या मुशाफिराची जिंदादिली वेगळीच. त्यामुळे घराशी फारकत घेऊन –
‘आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे!
चालू दे वक्षांत माझ्या वादळांचे येरझारे!’

हा दुर्दम्य आत्मविश्वास बाळगून, या कलंदराने आपल्याच नव्या वाटा निर्माण केल्या. अमरावतीच्या रस्त्यावरुन आपल्याच धुंदीत अनवाणी पायाने फिरणारा हा प्रतिभासंपन्न कवी अमरावतीच्या राजकमल चौकाने, खापर्डे बगीच्यातील ढवळे पाटलांच्या बंगल्याने पुरेपूर अनुभवला. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते.

आयुष्यातील हाल-अपेष्टा, कुचंबणा यासह ते कविता जगले, ती जगवली. अनेक नवोदित कवींना त्यांनी लिहिते केले. त्यांच्या कवितांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांचे भरभरून कौतुक केले. प्रसंगी आपली कविता मागे ठेऊन त्यांच्या प्रसिद्धीसाठी शब्द टाकला. मनाचा मोठेपणा आणि वृत्तीचा दिलदारपणा दाखवणारा हा कवी जाणून घेतला पहिजे. भल्याभल्यांना हे जमत नाही.
सहज, सोप्या, सुंदर काव्यरचना करणाऱ्या या कवीवर रसिकांनी आणि सामान्य माणसांनी भरभरून प्रेम केले. आपल्या काव्याचा श्रोता हा ‘व्हाईट कॉलर्ड’ असला पाहिजे असा अट्टाहास त्यांनी कधीही बाळगला नाही. उलट साध्या-साध्या माणसांना त्यांनी आपले मानले. त्यांना कविता ऐकविल्या,
‘साधीसुधी ही माणसे
माझ्या कवीत्त्वाची धनी
यांच्यात मी पाही तुका
यांच्यात नामयाची जनी.’
असेच ते म्हणत. अमरावतीच्या राजकमल, रेल्वे स्टेशन चौकातील दुकानांचे कट्टे हे त्यांचे रात्रीही सुरू असणारे ऑफिस होते आणि रिक्षेवाल्यांपासून तो कारवाल्यापर्यंत सर्वांचे हक्काचे व्यासपीठ. १९८० साली अमरावतीला रंग माझा वेगळा हा कार्यक्रम साहित्य संगमङ्खने आयोजित केला होता. कार्यक्रमाची सर्व तिकीटे संपली. नगर वाचनालयाचे सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले. पाय ठेवायलाही जागा नव्हती. शेवटी, सभागृहाची दारे बंद करण्यात आली. पण, रसिकांची गर्दी कमी होत नव्हती. दोन-तीन महिला व चार-पाच माणसे असे एक मित्रांचे कुटुंब काही वेळाने आले. दारावरचा कार्यकर्ता त्यांना तिकीट नसल्याने आत जाऊ देईना. त्या प्रतिष्ठित माणसाने चक्क त्यावेळी भांडण केले. अरे तिकिटाची काय गोष्ट करता? शंभराचे दोनशे घ्या. पण, आमच्या आवडत्या कवीला आम्हाला ऐकू. नाहीतर, कार्यक्रम नेहरू मैदानात घ्या! रसिकांचे इतके उदंड आणि अस्सल प्रेम त्यांना लाभले. हे प्रेम फार थोड्यांच्या वाट्याला येते. सुरेश भटांच्या ते आले. कारण प्रत्येक सामान्य माणसाला त्यांच्या कवितेत स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसते. हे दुःख, ही वेदना आपलीही आहे असे वाटते. कारण कुंथून-कुंथून कविता त्यांनी कधी केल्या नाहीत. जे आतून आले तेच कागदावर उतरविले. त्यांनी अनेक रचना महिनो गणती अपूर्ण ठेवल्या.

‘सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा’ असे म्हणणाऱ्या कविवर्य सुरेश भटांना निवडणुकीचा सूर काही सापडला नाही. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाकडून पश्चिम नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढवणा-या भटांना पराभूत व्हावे लागले होते. मात्र त्यांनी निवडणूक लढण्याची जिगर दाखवली होती हेही नसे थोडके ! एके काळी साहित्यातील गटबाजीने म्हणण्यापेक्षा मठबाजीने साहित्याला उणेपणा आणला होता. साहित्यिकांच्या टोळ्यांनी स्वतःची लेबले तयार केली. प्रतवारीची सारी कंत्राटे वाटल्या गेली. भटांच्या काव्यालाही ही सोयीस्कर लेबले लावल्या गेली. जे कोणालाच, प्रत्यक्ष कविलाही आयुष्यभर कळत नाही ते साहित्य, काव्य दर्जेदार नि सामान्य माणसाच्या अंतःकरणाला जाऊन भिडणारे, विचारी माणसाला अंतर्मुख करणारे साहित्य हे दुय्यम ही मखलाशी आणि ढोंगबाजी केल्या गेली. खोट्या विद्वत्तेचा बुरखा पांघरून भट कधी कोणत्या ट्रांसमध्ये गेले नाहीत. लंडनच्या अल्बर्ट हॉलमधे कवीता पोहचल्यावर, सिनेमात आल्यावर किंवा मानमान्यता मिळाल्यावरही यशाने ते हुरळून गेले नाहीत. दुर्बोध शब्दांची कल्हई भटांनी आपल्या काव्याला केली नाही. त्यांनी सदैव सोप्या भाषेत काव्यनिर्मिती केली. सत्य व सोपे लिहिणे कठीण असते. भटांनी कोणत्याही मठाची कधीही तमा बाळगली नाही, त्यामुळे –
‘खुराड्यात रचती जे जे षंढ दंभगाथा;
का तयासं इंद्रायणी ही तारणार आहे?
मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या,
विठू काय बेमानांना पावणार आहे?’
असे भविष्य भट वर्तवितात.

भट जगले ते आपल्या मिजाशीतच. स्व. अरविंद ढवळे यांनी सुरेश भट या आपल्या कविमित्राची प्रत्येक मिजास पूर्ण केली. ते उत्तमोत्तम कसे लिहितील, त्याला अनुकूल वातावरण कसे लाभेल, याचा त्यांनी प्रत्येकवेळी विचार केला. भटांना त्यांनी खूप सांभाळले. स्व. अरविंद ढवळेंचे घर म्हणजे भटांसाठी हक्काचे घर होते. श्रीमती मीनावहिनींनी अनेकदा रात्री बारा वाजताही स्वयंपाक करून त्यांना जेऊ घातले. भटांनी आपला काव्यसंग्रह या मित्राला अर्पण केला. अरविंद ढवळेंच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्यावर तो गात-गात गेला हा लेख लिहिला. तो त्यांचा अखेरचा लेखा ठरला. १५ मार्च, २००३ ला सुरेश भटांचे दुःखद निधन झाले. भटांच्या अंत्यसंस्काराची बातमी आणि स्व. अरविंद ढवळेंवरील लेख १६ मार्च, २००३ च्या लोकमत मध्ये एकाच दिवशी प्रसिद्ध झाले. दोस्ताना अजरामर झाला. एक दिवस रात्री दहा-साडे दहा वाजता ‘ए देख अरविंद, मुखडा’ म्हणून भटांनी –
‘जय जन्मभू ! जय पुण्यभू !
जय स्वर्गभू सुखदायिनी !
जय धर्मभू! जय कर्मभू !
जय वीरभू जयशालिनी !’
हा मुखडा लिहिलेला कागद दाखविला. त्यावर अरविंद ढवळे म्हणाले, व्वा सुरेश, मुखडा फारच जबरदस्त आहे. पण फक्त तू मुखडेच लिहिशील काय? कधी तर ते पूर्ण कर! हे म्हणजे भटांच्या प्रतिभेलाच आव्हान होते. ‘तू मले काय समजत्‌ं बे ! मी काय लिहू शकत नाही ? चल एक स्पेशल खोली, एक थर्मास चहा, तंबाखू-चुन्याची सोय कर अन्‌ मग पाहा…’
सर्व व्यवस्था झाली. अकरा वाजता त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि सकाळी साडे पाचला त्यांनी खोलीचे दार उघडले ते भारतमातेचे जयगान घेऊनच. खोलीचे स्वरूप पालटले होते मात्र कवितेने आकार घेतला होता.
‘एकेक इथला कण म्हणे,
जय जय सचेत महानता।
हे गगनमंडल गुंजते,
जय एकता! जय एकता!
उसळून सागर गर्जतो,
जय भारतीय स्वतंत्रता!
अंधारल्या जगतामध्ये झळके तुझी सौदामिनी !’
या अजरामर ओळी जन्माला आल्या. मराठी भाषेतील इतके सोपे, साधे व देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले भारतमातेचे जयगानङ्ख विरळेच म्हटले पाहिजे.

हजरजबाबीपणा ही सुरेश भटांच्या व्यक्तीत्वाची खासीयत होती. आपला हिसाब किताब तोंडावर करुनच ते मोकळे व्हायचे. त्यावेळी सुरेश भट दै. हिंदुस्थान मध्ये काम करीत असत. जोशी मार्केटमधील रहाटगावकर पांडे लॉजच्या खाली दै. हिंदुस्थान चे कार्यालय होते. रात्रपाळीत काम केल्यावर तिथेच प्रेसच्या बाहेर झोपण्याचा त्यांचा शिरस्ता होता. उन्हाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे रात्रपाळी करून सुरेश भट प्रेसबाहेर खाट टाकून झोपले. सकाळी सात-साडेसातला झोपेतून उठत असतांना त्यांच्या परिचित एक महिला प्राध्यापिका रिक्षाने कॉलेजमध्ये जात होत्या. भटांना पाहून हिणवायच्या दृष्टीने त्या म्हणाल्या, काहो भट, तुम्ही, इथे झोपता? त्यावर कमरेवर हात ठेऊन हो, मी इथेच झोपतो, तुम्ही कुठे झोपता? असे उत्तर देऊन त्यांनी हिसाब चुकता केला. बाईने पुढे भटांच्या झोपण्याकडे तर सोडाच पण प्रेसकडेही कधी वळून पाहिले नाही.

महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा सुरेश भटांना आत्यंतिक अभिमान होता, ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी … एवढ्या जगात माय मानतो मराठी’ या त्यांच्या कवीतेच्या ओळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा मंत्र ठरल्या होत्या. शाहीर अमरशेखांच्या खड्या आवाजात प्रचाराच्या फडात त्या गायल्या जात. स्वतः सुरेश भटांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तीन महिने तुरुंगवास भोगला याची अनेकांना कल्पना नसेल. गरीब आणि सामान्य माणसाची कणव त्यांच्या अंतःकरणात सदैव असायची. जात-पात, धर्म, भाषा या पलिकडे जाऊन त्यांचा आचार होता. जातीयतेच्या विपवल्लींनी माणूस पोखरला आहे. याची त्यांना सतत बोच असे. श्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. दलित समाजातला एक रसिक माणूस मुख्यमंत्री झाला या आनंदात त्यांनी श्री सुशीलकुमारजींना कवीला लिहून पाठविली.
‘सांग मला दळणार्याी जात्या जात कोणती माझी
झाले ज्यांचे पीठ मघा ते कुठले दाणे होते….’

सात दशकांच्या आयुष्याच्या प्रवासात हा कवी सप्तरंगी आयुष्य जगला. खिश्यात दमडी नव्हती तेव्हा रस्त्यांवरून अनवाणी फिरला. बरे दिवस आले तेव्हा मोटारीतूनही हिंडला. खिश्यात पैसे असतांना दहा-वीस लोकांना सोबत घेऊन खिलवले, तर पैसे नसतांना मित्रांकडून हक्काने खाल्ले. जाडा-भरडा पैजामा घातला तसा मखमलीचा शर्टही वापरला. पंचतारांकित ताजमहाल हॉटेलही पाहिले नी नानकरामच्या गाडीवर, पाटलीवर बसून पाणीपुरीही खाल्ली. त्यांचे खाणे चवीचे आणि वागणे अस्ताव्यस्त मनस्वी कवीचे होते. सुख-दुःखाचे अनेक रंग त्यांनी अनुभवले. पण सामान्य माणूस, मराठी भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दैवतांशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. आपल्या भुवया विशिष्ट विभ्रमांसह उडवत, चष्म्याच्यावरून पाहत, गालावर खळी उमटवत ‘जीवना तू तसा-मी असा !’ हे ते प्रांजळपणे सांगत-
‘मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो,
जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो…’

अशी आपल्या चुकांची जाहीर कबुलीही त्यांनी दिली. ही कबुली द्यायला सुरेश भटांचीच छाती लागते. त्यांच्या छंदापेक्षाही त्यांच्या अंतरंगातील वेदना आणि त्यांचे जगणे समजून घेणे महत्वाचे आहे. कारण सुरेशभट पुन्हा पुन्हा होत नसतात अन त्यांचे काव्य उमजायला वर्षे पुरी पडत नसतात…

संदर्भ – सुरेश भट : व्यक्ती आणि वल्लीही : डॉ. किशोर फुले’

लेखक संपर्क – 8380973977