अर्णव गोस्वामीने रात्रभर खाल्ली पोलीस कोठडीची हवा! कोर्टाने सुनावली १४ दिवसांची कोठडी

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गोस्वामी यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर अर्णब यांचे वकील आबड पोंडा आणि गौरव पारकर यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात पोलिसांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. काल रात्री तब्बल ६ तास न्यायालयात सुनावणी झाली.

अलिबाग इथे दाखल झालेली एफआयआर रद्द व्हावी अशी मागणी करणारी याचिका अर्णब गोस्वामी यांच्या वतीने हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज दुपारी ३ वाजता हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरा ही सुनावणी संपल्यामुळे अर्णब यांना कालची संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्येच काढावी लागली.

अर्णब गोस्वामी यांना काल सकाळीच पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना अलिबाग पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पहिल्यांदा कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे कोर्टानं त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले.

मात्र, सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयानं त्यांना समज देत फोन बंद करण्याचे निर्देश दिले. वैद्यकीय चाचणीनंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा दावा कोर्टानं फेटाळलाय. दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबईतही एक गुन्हा दाखल झालाय. अटक करताना महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आणि सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

विशेष तपास पथक
हाय प्रोफाईल केसमुळे रायगड पोलिसांनी तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथकाने अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. तपासणीदरम्यान तपासाची पुढील दिशा निश्चित होण्यास चांगलीच मदत मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here