हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतामध्ये धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात धूम्रपान करणे शरीरासाठी घातक असते हे डॉक्टरांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र आता एका संशोधनातून धूम्रपान करण्यासंदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये, “जे व्यक्ती 40 वय होण्यापूर्वी धूम्रपान सोडतात ते व्यक्ती धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींसमानच जीवन जगतात” असे सांगण्यात आले आहे.
NEJM Evidence या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, जी लोक कोणत्याही वयात धूम्रपान सोडतात ती धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या बरोबरीनेच दीर्घायुष्य जगू शकतात. याचा फायदा त्यांना तीन वर्षांच्या आत मध्येच दिसून येतो. म्हणजेच, कोणत्याही वयामध्ये धूम्रपान सोडणे त्या व्यक्तीला लाभदायक ठरू शकते.
याबाबतची माहिती देत टोरंटो विद्यापीठाच्या दल्ला लाना स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक प्रभात झा यांनी म्हटले आहे की, “मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान सोडणे प्रभावी आहे. लोकांना त्याचे फायदे लवकर मिळू शकतात. यात बऱ्याच लोकांना असे वाटते की, धूम्रपान सोडण्यासाठी त्यांना उशीर झाला आहे. परंतु हा अहवाल तुम्हाला सांगतोय की अजून उशीर झालेला नाही. तुम्ही मोठ्या आजारांचा धोका कमी करू शकता. याचा अर्थ तुम्ही दीर्घ आणि चांगले आयुष्य जगू शकता.”
महत्वाचे म्हणजे, धूम्रपान सोडण्याविषयी केलेल्या अभ्यासात यूएस, यूके, कॅनडा आणि नॉर्वे या चार देशांचा समावेश होता. या देशातील 1.5 दशलक्ष प्रौढांचे 15 वर्षे निरीक्षण करण्यात आले. या अभ्यासातून हे समोर आले की, 40 ते 79 वयोगटातील धूम्रपान करणाऱ्यांच्या मरण पावण्याचा धोका कधीही धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत जवळजवळ तिप्पट आहे. म्हणजेच त्यांनी सरासरी 12 ते 13 वर्षे आयुष्य गमावले आहे.
तसेच संशोधनातून हे देखील स्पष्ट झाले की, पूर्वी धूम्रपान करणे सोडलेल्या व्यक्तींनी धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत मृत्यूचा धोका 1.3 पटीने कमी केला आहे. त्याचबरोबर, धूम्रपान सोडल्याने रक्तवहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचा देखील धोका कमी होतो असे संशोधनातून उघडकीस आले आहे.