सातारा | राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार डिसेंबर जाहीर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या, मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित अशा सर्व राज्यांतील एकूण 26 नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम आजपासून (दि. 10) सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वडूज, खंडाळा व दहिवडी या चार नगरपंचायतींचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव आज (दि. 10) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे. या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास गुरुवारी (दि. 11) जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता द्यायची असून, त्याचदिवशी सदस्यपदाच्या आरक्षणाच्या सोडतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व नगरपंचायतीच्या वेबसाईटसह नोटीस प्रसिध्द करावयाची आहे. शुक्रवारी (दि. 12) मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतींच्या सदस्य पदाचा आरक्षणाची सोडत काढावयाची आहे. त्याचदिवशी प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्यपदांच्या जिल्हाधिकारी आरक्षणाची अधिसूचना रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागवण्यासाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.
त्यावर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी शुक्रवारपासून (दि. 12) मंगळवार पर्यंत (दि.16) असून प्राप्त हरकती व सूचनांवर बुधवारी (दि. 17) जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी करावयाची आहे. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासनाकडे गुरुवारी (दि. 18) अहवाल पाठवावयाचा असून, अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्तांनी सोमवारी (दि. 22) मान्यता द्यावयाची आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 23) जिल्हाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतींच्या वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध करावयाची आहे.