कराड नगरपालिकेचा संकल्प : कृष्णा- कोयना नदीकाठी 20 हजार झाडांची वृक्षलागवड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत कराड नगरपरिषदेने कृष्णा कोयना नदीकाठी 20,000 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक वर्षी पुरामुळे नदीकाठील माती वाहून जाते ते थांबवण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कृष्णा कोयना नदी काठी 500 हजार झाडाची लागवड करण्यात आली. प्रत्येक झाडाला ठिंबक सिचनने पाणी पुरवठा करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनापासून वृक्षलागवडीची सुरवात करण्यात आली आहे. पालिकेने शहरातील सदाभाऊ पेंढारकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूकडून थेट प्रीतिसंगम बागेपर्यंत नदीकाठावर जमिनीवर वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी 20 हजार झाडे लावली जाणार आहेत. यावेळी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार ,जलनिस्सारण अभियंता ए. आर. पवार, सर्व विभागीय अधिकारी ,कर्मचारी ,पत्रकार, नागरिक आणि ग्रीनी टीम उपस्थित होते.

माझी वसुंधरांतर्गत राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपणामुळे जमिनीची धूप थांबणार आहे. त्याशिवाय प्रीतिसंगम बागेसहित ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्मारकालाही नैसर्गिक संरक्षण मिळणार आहे. त्यासह नदीकाठावरील निसर्गही समृद्ध होणार आहे. पक्ष्यांची आश्रयस्थाने वाढणार आहेत. या मोहिमेमुळे स्वच्छ व हिरवेगार कराड शहर दिसून येईल, यासाठी शहरातील विविध मोकळ्या जागी पालिका वृक्ष लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.