औरंगाबाद – गेल्या आठवड्यात राज्यभरात कोविड 19 व ओमीक्रॉनची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीपासून शहर व जिल्ह्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात जिल्हाभरात सर्व सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हे आदेश जारी केले.
गेल्या काही दिवसात राज्यात यापूर्वीच ओमीक्रॉन कोविड 19 च्या 88 प्रकरणांची नोंद झाली आहे. ख्रिसमस, विवाह सोहळे, अन्य सण व नविन वर्षानिमित्त साजरे होणारे समारंभ पाहता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावले आहत. त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातही पुढील आदेशांपर्यंत काही निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे या शनिवारी मध्यरात्री जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या स्वाक्षरीने संयुक्तपणे आदेश जारी करण्यात आले आहेत.
काय आहेत आदेश –
– संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
– लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
– इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
– उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसन क्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसन क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
– क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
– वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल.
– उपाहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
– याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांनी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
– जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधांची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.




