सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नायगाव गावचे सुपुत्र प्रदीप अशोकराव धुमाळ हे १९ वर्षे देशसेवा करून ३१ जानेवारी रोजी सेवा निवृत्त झाले. सेवा निवृत्त झाल्यानंतर ते नायगाव येथे घरी परत आले असता त्यांचा व कुटुंबीयांचा गावातील ग्रामस्थांनी सत्कार केला. तसेच यावेळी फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून गावातून मिरवणूकही काढली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील नायगाव गावचे सुपुत्र प्रदीप अशोकराव धुमाळ यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान, लखनौ,उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या ठिकाणी सेवा बजावली. तसेच ऑपरेशन विजय व ऑपरेशन पराक्रम यामध्ये सहभाग घेतला. त्यांनी सिग्नल डिपार्टमेंटमध्ये गुप्तचर विभागात काम केले. त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पदकांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
देशसेवेत असताना “ऑपरेशन विजय”च्या दरम्यान जवान प्रदीप धुमाळ यांच्या उजव्या हाताच्या बोटाला एक गोळी चाटून गेली होती. अशा जवान प्रदीप धुमाळ यांचा ग्रामस्थांच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सेवानिवृत्त जवान प्रदीप धुमाळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती.