मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील समता नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काही लोकांनी चोर समजून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. या आरोपींनी रिक्षाचालकाचे हातपाय बांधून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात संबंधित रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे यामध्ये एक संतप्त जमाव रिक्षा चालकाला मारहाण करताना दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करत आहेत.
शाहरुख शेख असे हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून तो समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामी नगर परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी मृत शाहरुख हा समता नगर परिसरात असताना काही स्थानिक नागरिकांनी त्याला चोर समजून बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींनी मृत शाहरुखचे हातपाय बांधून त्याला निर्मल चाळीजवळ फेकून दिले.या घटनेच्या 2 तासांनंतर स्थानिकांनी समता नगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर शाहरुखला उपचारासाठी तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मृत शाहरुख याचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी रविवारी उत्तर प्रदेश विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या कार्यालयाबाहेर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी धरणे आंदोलन केले. यावेळी माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असून माझ्या मुलाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शाहरुखच्या कुटुंबीयांनी केली आहे. समता नगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.