औरंगाबाद | पैशाच्या वादातून रिक्षाचालकाचा चाकूने भोसकून निघून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री नारेगाव परिसरातील दर्गा मशिदीसमोरील रस्त्यावर घडली. शेख वसीम शेख फरीद उर्फ शहारुख (वय 27) रा. नारेगाव, असे रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघा भावांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख वसीम हा नारेगाव परिसरात राहणाऱ्या शेख असिफ शेख मुसा यांच्या भावाची रिक्षा चालवत होता. गेल्या काही दिवसापासून वसीम आणि असे त्यांच्यामध्ये पैशाच्या देण्या-घेण्यावरून वाद सुरू होता. 10:30 वाजेच्या सुमारास मित्राला भेटून येतो, असे म्हणून वसीम घराबाहेर पडला. मात्र, मित्राच्या घरी न जाता तो आसीफ सोबत बाहेर गेल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले होते. या दोघांमध्ये वाद झाल्याने आसीफने त्याला चाकूने भोसकून जखमी केले होते. ही माहिती मिळताच परिसरात मोठा जमाव जमला. जखमी अवस्थेत आसीफला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी रविवारी एमआयडीसी सिडको पोलिसांनी आसीफ सह त्याच्या अन्य दोन भावांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार आसीफनेच वसीमचा खून केल्याची बाब समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.