‘हम जहाँ खडे हो जाते है..’ बॉलिवूड जगतातील महानायकाची ५२ वर्षांची यशस्वी कारकीर्द

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने संपूर्ण सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. केवळ भारतात नव्हे तर, संपूर्ण जगभरातून त्यांचे कोट्यावधी चाहते आहेत. आज दिनांक ३१ मे असून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीस १०- २० नव्हे तर तब्बल ५२ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. आजही त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील डायलॉग त्यांच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ आहेत. त्यांनी प्रत्येक चित्रपटात साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या आहेत. अमिताभ यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्याचीच पोचपावती म्हणजे आजची ही ५२ वर्ष. याबद्दल त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती देत आनंद व्यक्त केला आहे.

 

अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्राम सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक गाजलेल्या भूमिकांचे फोटो कोलाजमध्ये सामायिक केले आहे. यात अमिताभ बच्चन यांच्या सात हिंदुस्थानी या पहिल्या चित्रपटापासून यावर्षी रिलीज होत असलेल्या ‘मे डे ‘ या आगामी चित्रपटापर्यंत प्रत्येक लूक या पोस्टमध्ये सामील केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘५२ वर्षे.. तसेच, ज्याने हे पोस्टर बनवले त्या व्यक्तीचे आभार.’ बिग बींची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांना अत्यंत आवडली आहे. तसेच, त्यांचे चाहतेही या पोस्टवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘सर, मी तुमचा मोठा चाहता आहे.’ तर दुसर्‍या युजरने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तुमच्यासारखं अन्य कुणीच होऊ शकत नाही अशा आशयाची समीक्षा दिली आहे.

अमिताभ बच्चन याना ‘आनंद’ या चित्रपटासाठी बरेच पुरस्कार मिळाले आहेत. मात्र ‘जंजीर’ या चित्रपटामूळे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची जागा तयार केली. आता लवकरच बिग बी अभिनेता इम्रान हाश्मीसह ‘चेहरे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसमवेत रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.