माहिती अधिकार कायदा : कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण, कर्मचारी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | माहिती अधिकारात मागवलेली माहिती अशीच का दिली, असे म्हणून एकाने कराड नगरपालिका अधिकाऱ्यासोबत वाद घालत त्यानंतर नगरपालिकेच्या परिसरात त्यास मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा धैर्यशील विलास कराळे (वय-42, शनिवार पेठ मुळीक चाैक, कराड) व जालिंदर प्रताप वाघमारे (वय- 43, हनुमान मंदिर शेजारी बनवडी, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद कराड नगरपालिकेचे रचना सहाय्यक रोहन बाळासाहेब ढोणे (ज्ञानदेव काॅलनी, सैदापूर) यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी, नगरपालिकेत माहिती अधिकार कायद्यानुसार धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी नगरपालिकेकडे माहिती मागवली होती. त्यानुसार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने संबंधिताला माहिती दिली होती. परंतु दिलेली माहिती अशीच का दिली, असे म्हणून संबंधित माहिती मागणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी सायंकाळी नगरपालिकेत येऊन माहिती दिलेल्या कर्मचाऱ्याबरोबर वादावादी केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार करत नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कराड शहर पोलीस ठाणे गाठले.

पोलिस ठाण्यासमोर मुख्याधिकारी रमाकांत डाके, यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला.