हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्याबाबत रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) देशातील सर्व बँकांना अलर्ट केलं आहे. तसेच सायबर हल्ल्याचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षा वाढवा असेही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँकिंग क्षेत्र हे देशातील सर्वात मोठं आणि अत्यंत्य महत्वपूर्ण असं क्षेत्र असून जर बँकावरच सायबर हल्ला झाला तर देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच सर्व बँकांना सावध केलं आहे.
सध्या डिजिटल बँकिंग वाढल्याने सायबर हल्ल्यांचे धोकेही वाढले आहेत. RBI ने अलीकडेच जोखीम हाताळण्यासाठी बँकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सायबर सिक्युरिटी आणि माहिती तंत्रज्ञान परीक्षा घेतली जाते, ज्याला CSight असेही म्हणतात. CSight अंतर्गत, RBI ची तपासणी पथक सर्व बँकांच्या IT प्रणालीची कसून तपासणी करते. ज्या गोष्टींमुळे बँकांना धोका निर्माण होऊ शकतो अशा गोष्टी या तपासादरम्यान चेक केल्या जातात आणि त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हे सुद्धा सांगितलं जाते.
खरेतर, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी 9 फेब्रुवारी रोजी 19 व्या बँकिंग तंत्रज्ञान परिषदेत बोलताना म्हटले होते की बँकिंग क्षेत्राने नवीन सायबर धोक्यांसाठी तयार राहावे. ग्राहकांच्या सोयी आणि इतर गोष्टींचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले होते. एआयच्या गैरवापराचे धोके ओळखण्यासाठी आणि हे धोके कमी करण्यासाठी बँकांना त्यांच्या एनक्रिप्टेड सिस्टम पुन्हा एकदा नव्याने तयार कराव्या लागतील असेही त्यांनी सांगितलं होते.
भारतीय बँकांनी जून 2018 ते मार्च 2022 दरम्यान हॅकर्स कडून 248 यशस्वी डेटा उल्लंघनाची नोंद केली आहे, भारत सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी 41 प्रकरणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नोंदवली आहेत. तर खासगी क्षेत्रातील बँकांनी २०५ प्रकरणांची माहिती दिली. तसेच परदेशी बँकांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.