सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलचे वरच्या बाजूच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तसेच याठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असल्याने महसूल विभागाने या ठिकाणाचा पंचनामा करत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दांडेघर गावच्या हद्दीत मुख्य मार्गालगत डोंगर उतारावर असणाऱ्या निवासी शाळेच्या वरच्या भागातील सर्वे नंबर २३/६ जमीन मोठ्या प्रमाणात खचली आहे. गेली पंधरा दिवसांपासून पडत असणाऱ्या अतिवृष्टीने जमिन सुमारे अडीच फूट खाली खचली, असून डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. सायंकाळी तलाठी दीपक पाटील, निलेश गीते यांनी उपसरपंच जनार्दन कळंबे, अशोक कासूर्डे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. यावेळी येथील परिस्थितीची पाहणी करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाल्याने अधिकाऱ्यांनी शाळेतील मुलांना तातडीने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत.
पाचगणीत शाळेला भूस्खलनाचा धोका, विद्यार्थ्यांच्या स्थलांतरांचे आदेश@HelloMaharashtr pic.twitter.com/E6lzeRfwV1
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) July 21, 2022
सध्या पांचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून घाटातील दरड कोसळण्याचे प्रकार सुरू असून जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या भेगांमुळे शाळेच्या लगत असणारी दरड पाण्याच्या टाक्या जवळ आली आहे. तर एक झाडही यामध्ये उन्मळून पडले असून वीजेचा खांब कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.