गुजरात गँगरेप प्रकरणी रितेश देशमुखनं ट्विटवरून व्यक्त केला राग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र ।  दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर देशात सरकार बदलेले, कायदे बदलेले, नवीन कायदे आणले गेले तरी बलात्काराच्या घटना थांबत नाही आहेत. दिल्ली, बदायू, उना, हैद्राबाद या दरम्यानच्या अनेक बलात्काराच्या घटना देशातील महान समाजाच्या चेहऱ्यावर ओरखडे ओढत राहिल्या पण परिस्थितीत काही बदल झाला नाही आहे. यात आणखी भर पडली आहे ती गुजरातमध्ये घडलेल्या घटनेची. गुजरातमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करून तिचे शव झाडावर लटकवण्यात आले होते. या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या संतापजनक प्रकारावर अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून न्यायाची मागणी केली आहे.

“१९ वर्षीय तरूणीचे अपहरण, सामुहिक बलात्कार, हत्या आणि मग झाडावर लटकवले. विसरून जा की ती तरूणी कुठल्या धर्माची आहे? किंवा ती कुठल्या जातीची आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की ती एक तरुण मुलगी होती. जिच्यासमोर संपूर्ण आयुष्य आशा आणि आकांक्षांनी भरलेलं होतं. त्या आरोपींना फासावर लटकवा.” अशा आशयाचे ट्विट करुन रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे.

रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर व्यक्त होताना दिसतो. रितेशने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.