नवी दिल्ली । देशभरातील सार्वजनिक वाहतुक सुरु करण्याबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या १० दिवसात देशभरातील सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन लागू झाल्यापासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, बंद असलेली सार्वजनिक प्रवाशी वाहतूक सुरू करण्याबाबत गडकरी म्हणाले की, ”आता सार्वजनिक प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होईल. दुकानं देखील हळूहळू सुरु होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यासाठी काही गाईडलाईन बनवण्यावर विचार सुरु आहे. आमचा विभाग या गाईडलाईन्सचं पालन करेन,” असं देखील गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, काल नितीन गडकरी यांनी बस आणि कार ऑपरेशन कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनमुळे बस आणि कार चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांचे प्रश्न सोडविण्यासठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले होते. ” सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग खुले केल्यानंतर लोकांमध्ये आत्मविश्वास येईल असा अंदाज आहे. पण यासाठीही आधी नियमावली आखून देण्यात येईल आणि त्यानंतरच सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरू करण्यात येईल असं गडकरी म्हणाले होते.
राज्यांसोबत केंद्राच्या समन्वयाबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, ”राजकारण आपल्या जागी आणि आता आलेलं हे संकट आपल्या जागी आहे. हे संकट गंभीर आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यानंतर भारताला महासत्ता बनवण्यासाठी कुठलेही राजकीय मतभेद नाहीत. आम्ही कुणीच सध्या राजकीय मतं व्यक्त करत नाहीत. मी महाराष्ट्रात आहे. दर दोन तीन दिवसांनी मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलतो. माझ्या काही सूचना असतात त्या दोतो. पंतप्रधान मोदी देखील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद करत आहेत,” असं गडकरी यांनी सांगितलं.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”