औरंगाबाद – शहरात चालत्या रिक्षातून तरुणीने उडी मारण्याची घटना ताजी असतानाच, आता एका प्रवाशाने आपली सुटका करण्यासाठी चालत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत असलेला तरुण शेंद्रा येथील घरी जाण्यासाठी चिखलठाणा येथून रिक्षात बसला. चालकासह इतर दोघांनी रिक्षा शेंद्राकडे घेऊन जाण्याऐवजी जुना जालना नाका येथून जुना बीड बायपास रस्त्याने नेली. रेल्वे गेट च्या थोड्या अंतरावर रिक्षा गेल्यानंतर मध्यभागी बसलेल्या प्रवासी युवकाला लुटल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ट्रान्स एशिया बायोमेडिकल लिमिटेड कंपनीत नोकरी करत असलेला युवक विवेक विश्वकर्मा (29, रा. शेंद्रा) हा जळगाव येथून कंपनीचे काम आटोपून शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास औरंगाबादेत पोहोचला सिडको बस स्थानक परिसरातून रिक्षाने चिकलठाणा पर्यंत आल्यानंतर केंब्रिज चौकापर्यंत जाण्यासाठी दुसऱ्या रिक्षात बसला. या रिक्षात अगोदरच दोन प्रवासी बसले होते. त्यातील एकाने लवकर उतरायचे असल्याने विवेक यास मध्यभागी बसण्यास सांगितले. तीन प्रवासी बसून झाल्यानंतर चालकांनी रिक्षा केंब्रिज चौकाच्या दिशेने पुढे नेली. काही अंतरावर जाताना पुढे जाण्याऐवजी जुना जालना येथून जुन्या बीड बायपास रस्त्याकडे रिक्षाचालकाने रिक्षा नेली, तेव्हा विवेकने रिक्षा कोठे घेऊन जात आहेत असे विचारले असता चालकाने एका प्रवाशाला पुढे सोडायचे असल्याने या रस्त्याने आल्याचे सांगितले. रिक्षा शनि मंदिराकडे जाणार्या रस्त्याने रेल्वे गेट च्या पुढे गेल्यानंतर निर्जनस्थळी येताच पाठीमागे बसलेल्या एका प्रवाशाने खिशातून चाकू काढला, तर दुसऱ्याने विवेकच्या खिशातील मोबाईल हिसकावला जवळ असलेले सातशे रुपये देखील काढून घेतले. या झटापटीत दोन प्रवाशांनी विवेकला मारहाणही केली. त्यामुळे विवेकने चालत्या रिक्षातून उडी मारून आपली सुटका करून घेतली.
खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. यानंतर परिसरातील रहिवासी बाबासाहेब दहिहंडे यांनी लुटलेल्या युवकाला मदत करीत जालना रोड पर्यंत आले. त्यानंतर गस्तीवर असलेल्या एका पोलिसांच्या गाडीत बसून त्याला कॅम्ब्रीजे चौकापर्यंत पाठवण्यात आले. केंब्रिज चौकात युवकाचे वडील त्याला घेण्यासाठी आले होते. त्यांच्या सोबत युवक घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी एमआयडीसी चिकलठाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक डी.पी. सोनवणे करीत आहेत.