वरोरा प्रतिनिधी | सुरज घुमे
वरोरा शहरातील नागपूर – चंद्रपूर महामार्गलगत असलेल्या ईसार कंपनीच्या पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास दोन दारू तस्करांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत शुल्लक कारणावरून वाद घालत बेदम मारहाण करून खिशातील रक्कमही लुटण्याचा प्रयत्न केला. घटनेला संपूर्ण प्रकार सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याबाबत पेट्रोल पंप मालकानी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता सीसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
वरोरा शहरात अवैध दारूविक्रीमुळे शुल्लक कारणावरून अनेक वाद घडत असून हे वाद आता चांगलेच विकोपाला गेल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे. यापूर्वी अश्याच एका शुल्लक कारणावरून झालेल्या वादात काही लोकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. हे सर्व प्रकार रोखण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने दारूविक्रेत्याच्या मुजोरीत चांगलीच वाढ होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी उदाहरण वरोरा येथील पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे.वरोरा शहरात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दारुतस्करी होत असून या दारु तस्कराना लोकेशन देण्याकरीता प्रत्येक चौकात खबरी ठेवले जात असून हे खबरी रात्रभर प्रत्येक चौकात गस्त घालून बाहेरून येणाऱ्या दारू तस्करांच्या गाडीना फोनद्वारे खबर देण्याचे काम करीत असतात. या खबरींवर पोलिसांचा वचक न राहिल्याचे उदाहरण सोमवारी रात्रीच्या सुमारास बघायला मिळाले.
दारुतस्करांची मुखबिरी करणाऱ्या तस्करांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत शुल्लक कारणावरून वाद घालत कर्मचाऱ्यास मारहाण केली.कर्मचाऱ्याजवळ सुटे पैसे नसल्याने उशीर होत असलेल्या दारुतस्करांनी फ्री स्टाईल करीत कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली व कर्मचाऱ्यांच्या खिशातील पैसे वापस घेत पेट्रोल पंपावरून पळ काढला. सदर घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला झाल्याने पेट्रोल पंप मालकाने दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध कलम 151 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.वरोरा शहरात दारुतस्करच्या सतत होत असलेल्या फ्री स्टाईल मुळे शहरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी अवैध दारूविक्रेत्याविरुद्ध मोहीम राबवत 13 आरोपीने अटक केली मात्र शहरात दारु तस्करी करणारे मुख्य दारुतस्कर अजूनही पडद्याआडच आहे.या दारुतस्करांचा पडदाफास पाटील साहेब करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.