सातारा | पिकअप टेम्पोचे भाडे संपवून घरी जात असताना सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथे 7 ते 8 जणांच्या टोळक्याने पिकअप थांबवून चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. सोमवारी दि. 9 रोजी रात्री ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेश अनिल गोडसे (वय- 21, रा. वडूज ता. खटाव) यांनी याप्रकरणी तक्रार दिलेली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार ऋषिकेश, त्यांचा भाऊ व मामा असे तिघेजण साताऱ्यातून मूळ गावी वडूजकडे निघाले होते. पिकअप टेम्पो चिंचणेर वंदन येथे आल्यानंतर एका पानपट्टी समोर एक टोळके उभे राहिले होते. त्यातील एकाने पिकअप चालकाला वाहन थांबवण्यासाठी हात केला. त्यानुसार ऋषिकेशने वाहन थांबवले असता अनोळखी टोळक्यातील एकाने येवून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरवाजा उघडून बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर तक्रारदार यांचा भाऊ व मामाने मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही संशयितांच्या अन्य टोळक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीचा प्रकार सुरु असताना अज्ञातांनी तक्रारदार यांच्या डोक्यात जाहिरातीचा लोखंडी बोर्ड उचलून घातला. यामुळे ते रक्तबंबाळ झाले. सुमारे 20 मिनिटे हा गोंधळ सुरु असताना तक्रारदार यांच्या खिशातील संशयितांनी रोख 9 हजार रुपये चोरले व तेथून त्यांनी पळ काढला. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या तक्रारदार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांनी तक्रारदार यांची तक्रार घेतल्यानंतर वर्णनावरून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली.