वॉशिंग्टन । तालिबानने अफगाणिस्तानने ताबा मिळवल्यापासून, देशाच्या या अवस्थेसाठी, जगातील अनेक देश तसेच स्वतः अमेरिकन त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना दोषी मानतात. सैन्य मागे घेण्याच्या जो बिडेनच्या निर्णयानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि सामान्य जनतेला त्याचा फटका सहन करावा लागला. या निर्णयासाठी बिडेन यांना लक्ष्य करण्याची मोहीम अमेरिकेत सुरू झाली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रपतींना तालिबानी दहशतवादी म्हणून दाखवणारे होर्डिंग्ज सर्वत्र लावण्यात आले आहेत. ज्यावर लिहिले आहे, ‘मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन’.
‘द सन’ च्या रिपोर्ट्सनुसार, पेनसिल्व्हेनियाचे माजी सिनेटर स्कॉट वॅग्नर यांनी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या विरोधात ही मोहीम सुरू केली आहे. ते म्हणतात की,” बिडेन यांच्या या एका निर्णयामुळे अमेरिकेला संपूर्ण जगासमोर लाजिरवाणे व्हावे लागले, त्यांची खिल्ली उडवली गेली.” दोन महिन्यांच्या या मोहिमेचा एक भाग म्हणून, बिडेनला तालिबानी दहशतवादी म्हणून दर्शवणारे होर्डिंग्ज सर्वत्र लावण्यात आले आहेत.
तालिबानी गेटअपमध्ये बिडेन
बिलबोर्डवरील फोटोमध्ये बिडेन तालिबानी गेटअपमध्ये दिसून येत आहेत आणि त्यांच्या हातात रॉकेट लाँचर आहे. याद्वारे स्कॉट वॅग्नर यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेऊन तालिबान्यांना मदत केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या होर्डिंग्ज वर ‘मेकिंग द तालिबान ग्रेट अगेन’, म्हणजेच तालिबान्यांना पुन्हा महान बनवणे असे लिहिले आहे.
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघार
अमेरिकन अध्यक्षांनी अचानक अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. जो बिडेन म्हणाले की,”अफगाण सैन्य तालिबानचा सामना करण्यास सक्षम आहे. मात्र, काही दिवसांतच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेऊन बिडेन यांचे विधान खोटे असल्याचे सिद्ध केले.” या निर्णयामुळे बिडेनवर जोरदार टीका झाली. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांनाच अफगाणिस्तानच्या या स्थितीसाठी जबाबदार धरले. यानंतर, बिडन देखील काबूल विमानतळावरील स्फोटात अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूसाठी लोकांच्या निशाण्याखाली आले. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे बिडेन यांची अध्यक्ष म्हणून प्रतिमा डागाळली आहे.