ऑस्ट्रेलिया | वर्षातील पहिलं ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन सध्या ऑस्ट्रेलियात सुरु आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची घौडदौड सुरु असून त्याने सलग विसाव्या वर्षी तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचाही पराक्रम केला. दरम्यान एका सामन्यावेळी चेंजिंग रुममध्ये गेल्यानंतर ओळखपत्र नसल्याने सुरक्षारक्षकाने फेडररला अडविले. फेडरर हा दिग्गज खेळाडू असला तरी ओळखपत्र दाखविल्याशिवाय त्याला लॉकर उघडता येणार नाही अशी भूमिका सुरक्षारक्षकाने घेतली. यावर कोणताही वादविवाद न करता सहकाऱ्यांच्या मदतीने फेडररने ते ओळखपत्र मिळवले व सुरक्षारक्षकाला दाखविले. त्या जागी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चित्रण दिसून आल्यानंतर प्रेक्षकांनीही खुल्या मनाने फेडररची स्तुती केली.
नियम हे नियम असतात आणि ते पाळले पाहिजेत असं स्पष्टीकरणही सुरक्षारक्षकाने यावेळी दिलं. फेडररचा प्रशिक्षक असलेल्या इव्हान लुबीसीचने थोड्या वेळानंतर ओळखपत्र दाखवल्यानंतर फेडररला लॉकर उघडता आला. दरम्यान आज दिवसभर या गोष्टीची चर्चा समाजमाध्यमांवर रंगल्याची पहायला मिळाली.