मुंबई । भाजपलाच आता ‘आणीबाणी’ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही. भाजप सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले गेले. त्यावेळी भाजपला ‘आणीबाणी’ आठवली नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
सरकारविरोधात लिहिले, बोलले म्हणून द वायर, एनडीटीव्ही, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते आहे, असा थेट सवाल भाजपला रोहित पवार यांनी विचारला आहे. (Rohit Pawar)
सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या 'अभिनेत्यावर' कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 4, 2020
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ही कारावाई म्हणजे ‘आणीबाणी’ आणि पत्रकारितेविरोधात आहे, असे म्हटले होते. याला रोहित पवार यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी गोस्वामी यांच्या अटकेचं स्वागत केलं आहे. तसंच तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईबाबत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. अन्वय यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेत तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्वण गोस्वामी यांचं नाव आहे, तरीही कारवाई का केली गेली नाही? असा सवाल नाईक यांच्या मुलीने केलाय.
सातत्याने पाठपुरावा करुनही योग्य चौकशी करण्यात आली नाही. उलट आमच्यावरच सूडबुद्धीनं खटला दाखल केल्याचा आरोप लावण्याचा प्रयत्न झाला. पण आता मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया नाईक कुटुंबियांनी दिली आहे. ( Anvay naik family allegations on Arnav Goswami)
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in