हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राजकारणातील प्रत्येक नेत्यांची ओळख आहे ती मग कुणाची बोलण्यावरून तर कुणाची त्याला असलेल्या सवयीवरुन होय. मात्र, आपल्या परखड आणि रोखठोक भूमिकेमुळे ओळखले जाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही अनेकजण फॅन आहेत. त्याच्या या फॅनमध्ये आता आणखी एका प्रतिष्ठित व्यक्तीची भर पडली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांची होय. रोहित पवार यांनी मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन आहे, असे आज माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.
रोहित पवार यांनी आज बेळगावला जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यानंतर बेळगावहून कोल्हापूरमध्ये ते आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. कारण मी त्यांच्या या स्टाईलचा फॅन आहे.
यावेळी पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. “भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, असे रोहित पवार यांनी म्हंटले.
राज्यपालांनी अमित शहांऐवजी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते
यावेळी रोहित पवार पुणे बंदला पाठिंबा देत म्हणाले की, महापुरुषांचा वारंवार अवमान होत असेल, तर महाराष्ट्रातील जनता का गप्प बसेल? पुण्यातील बंदला छोटे दुकानदार, व्यापारी यांनी सुद्धा मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अस्मिता टिकवण्यासाठीच लोक एकत्र आले आहेत. राज्यपाल पत्राच्या माध्यमातून व्यक्त झाले. मात्र, माफी मागितली नाही. अमित शहा यांच्याऐवजी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला लोकं माफ करणार नाहीत. अशी किती पत्र लिहिली, तरी लोक माफ करणार नाहीत.