विजयाच्या वर्षपूर्तीनिमित्त रोहित पवारांनी कामाचं ‘रिपोर्ट कार्ड’ केलं सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तडफदार नेते रोहित पवार यांच्या प्रथम विधानसभा विजयाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने  आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्टकार्ड कर्जत जामखेडकरांसमोर ठेवलं आहे. “कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर आमदार म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो, पण तरीही गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो”, असं ते म्हणाले.

“निवडणुकीपूर्वीपासूनच मतदारसंघात संपर्क असल्याने इथल्या कामाचा बऱ्यापैकी आवाका लक्षात आला होता. रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न तर आ वासून होतेच पण सरकारी योजनाही लोकांपर्यंत पोचत नव्हत्या. त्यामुळं प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करुन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज याचे अनेक प्रस्ताव मंजूर करुन आणले. ही कामे लवकरच सुरु होतील. निवडणुकीपूर्वीपासूनच पाण्याचे टँकर सुरू होतेच, शिवाय गरज असेल तिथं नंतरही टँकर सुरु ठेवले. सीएसआर, ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’ यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन अनेक कामं हाती घेतली. त्यामध्ये वर्षानुवर्षे गाळाने भरलेल्या आणि झाडा-झुडपांनी वेढलेल्या विंचरणा व लेंडी नदीचा गाळ काढून नदीचं सुशोभीकरण करण्याचं काम हाती घेतलं” असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

कोरोनाच्या सुरवातीच्या चार महिन्यांच्या काळात कर्जत-जामखेडमधील शासकीय रुग्णालयांना औषधं, वैद्यकीय उपकरणं, PPE किट, मास्क यासारखी प्रतिबंधात्मक साधणं आणि आवश्यक त्या सुविधा पुरवल्या. कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढू लागल्यानंतर या सुविधांचा मोठा फायदा झाला. सुरवातीला दोन्ही तालुक्यात मध्यवर्ती क्वारंटाइन सेंटर सुरू केले. तिथं आंघोळीसाठी गरम पाण्यापासून तर चांगल्या दर्जाच्या जेवणाची सोय केली. डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक, पोलीस, आशाताई, अंगणवाडी सेविका, पत्रकार, मेडिकल स्टोअर्स चालक या कोरोना योध्यांना मास्क, सॅनिटायझरचं वाटप केलं.

शिक्षणाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्यांची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये शिकतात त्यांनाही शहरातील खासगी शाळांप्रमाणे उत्तम शिक्षण मिळावं, याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी या शाळांना डिजिटल पॅनेल दिले. ऑनलाइन शिक्षणासाठी अ‌ॅप विकसित करुन मुलांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली.असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढे म्हणाले, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात महिला समुपदेशन केंद्र सुरू करुन महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘स्वस्थ कन्या उज्ज्वल भविष्य’ हा उपक्रम निरंतर सुरूय आणि त्यासाठी माझ्या मातोश्री सुनंदाताई पवार या प्रचंड मेहनत घेत आहेत, हे आपण पाहतंच आहात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’