सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
समाजात अनेक लग्न समारंभ होत असतात. मात्र, काही लग्न समारंभ एका विशिष्ट अशा कारणांनी चांगलीच चर्चेत येतात. असेच एक लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील किसन धोंडिबा साळुंखे यांचे चिरंजीव रोहित आणि शामगांव (ता. कराड) येथील सदाशिव पोळ यांची कन्या ऋतुजा यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. या लग्न सोहळयात मंगलाष्टकापूर्वी रोहित आणि ऋतुजा या नववधु-वराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे विधीवत पूजन केल्यानंतर लग्नगाठ बांधली.
रोहितला पूर्वीपासूनच दुर्गभ्रमंती करण्याची खूप आवड आहे. अनेक गड,किल्ले त्याने पादाक्रांत केले आहेत. शिवशंभू ट्रेकर्सच्या माध्यमातून तो शिवजयंतीसह अनेक कार्यक्रमात सहभागी होत असतो. नुकताच रोहितचा विवाह प[आर पडला. आपला विवाह हा राजेंच्या साक्षीने व्हावा असे त्याने ठरवले. त्याने हि इच्छा त्याची होणारी बायको ऋतुजा हिला बोलून दाखवली. आणि त्याला तिनेही होकार दिला.
छत्रपती शिवरायांना वंदन करुन रोहित- ऋतुजाने बांधली लग्नगाठ pic.twitter.com/zJORZRc4Bs
— santosh gurav (@santosh29590931) March 13, 2023
त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाचा दिवस आला. लग्न मंडपातील स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवण्यात आली. नववधूवराने सात फेरे घेण्यापूर्वी आणि मंगलाष्टकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा केली. त्याची पूजा केल्यानंतर वधूवरांनी लग्नगाठ बांधली.रोहितने केलेल्या या आदर्शवत कृतीने लग्नात उपस्थित असलेल्या वर्हाडी मंडळींनी रोहितचे कौतुक केले. कट्टर शिवभक्त आणि धारकरी असलेल्या रोहितच्या छत्रपतींविषयी असलेल्या या प्रेमाची चर्चा उपस्थितात रंगली होती.