शिखर धवनच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची खास पोस्ट; म्हणाला, तू नेहमीच दुसऱ्या बाजूने….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर आणि गब्बर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. शिखरने काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची माहिती दिली. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज भारताचा कर्णधार आणि शिखर धवनसोबत अनेक वर्ष सलामीवीर म्हणून साथ दिलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) सुद्धा ट्विट करत शिखरबाबत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

काय आहे रोहितचे ट्विट ?

रोहित शर्माने ट्विटरवर शिखर धवनसोबतचे ४ वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. त्याने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल, ‘रूम शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत….. दुसऱ्या बाजूने तू माझे काम नेहमी सोपे केले आहे. द अल्टीमेट जाट…. रोहित शर्माचे हे ट्विट अगदी काही मिनिटातच व्हायरल झाले. अनेकांनी रोहितच्या या ट्विटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकमेकांसोबत सलामी दिली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडगोळीने २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. दोघांचे बॉन्डिंग चांगलं जमलं होते. एका बाजूला शिखर पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करायचा आणि गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलायचा. त्यामुळे दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या रोहितला अतिरिक्त वेळ घेण्याची संधी मिळायची. 2013 ते 2022 पर्यंत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 115 एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सलामी दिली, ज्यामध्ये त्यांनी 5148 धावा चोपल्या. या दरम्यान त्यांनी 18 वेळा शतकी आणि 15 वेळा अर्धशतकी भागीदारी केली. वनडे फॉरमॅटच्या इतिहासात ही चौथी सर्वाधिक धावा करणारी सलामी जोडी आहे.

शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

T20 आंतरराष्ट्रीय- 68 सामने, 1759 धावा, 27.92 सरासरी, 11 अर्धशतके
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय- 167 सामने, 6793 धावा, 44.11 सरासरी, 17 शतके आणि 39 अर्धशतके
कसोटी क्रिकेट- 34 सामने, 2315 धावा, 40.61 सरासरी, सात शतके आणि 5 अर्धशतके
आयपीएल- 222 सामने, 6769 धावा, 35.26 सरासरी, दोन शतके आणि 51 अर्धशतके.