विराटसाठी रोहित शर्माची बॅटिंग; थेट BCCI लाच दिला अल्टिमेटम??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये पार पडणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकामध्ये (ICC T20 World Cup 2024) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघात स्थान मिळणार नाही अशा बातम्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. दोन्ही देशातील खेळपट्ट्या संथ असल्याने विराटसाठी त्या उपयुक्त नाहीत असं कारण त्यावेळी समोर आलं होते. यामुळे विराटच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र आता भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा विराटच्या मदतीला धावून आला आहे. कोणत्याही परिस्थितीत मला विराट कोहली वर्ल्डकप मध्ये पाहिजेच असं रोहित शर्माने BCCI ला सांगितल्याचे समोर आलं आहे.

भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी याबाबत ट्विट केलं आहे. कीर्ती आझाद यांनी लिहिले, जय शाह सिलेक्टर नाहीत. विराट कोहलीला टी20 संघात स्थान मिळू नये, यासाठी त्यांनी अजित आगरकर यांना सांगितलं. त्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अजित आगरकर ना स्वतःला पटवून देऊ शकले ना इतर निवडकर्त्यांना. जय शाहने रोहित शर्मालाही विचारले, पण रोहित म्हणाला की आम्हाला विराट कोहली कोणत्याही किंमतीत हवा आहे. त्यामुळे विराट कोहली टी-२० विश्वचषक खेळणार असून संघ निवडीपूर्वी त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीकांत यांनीही कोहलीचे समर्थन केलं, विराट कोहलीशिवाय टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचा प्रश्नच येत नाही. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत नेणारा तो खेळाडू होता. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवणाऱ्यांना काही फायदा नाही. भारताला T20 विश्वचषक जिंकायचा असेल तर विराट कोहलीशिवाय पर्याय नाही असं श्रीकांत म्हणाले.

दरम्यान, विराट कोहली हा भारतचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. विराटने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहे. त्याच्या टी-20 कारकिर्दीबद्दल सांगायचं झाल्यास, विराटने आतापर्यंत भारतासाठी एकूण 117 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 138 च्या स्ट्राईक रेट 2922 धावा कुटल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची सरासरी 51 च्या आसपास आहे. विराटच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक पण आहे.