हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून कर्णधार विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार असल्याचे समजत आहे. तसेच कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय आणि T20 चा कर्णधार होऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा BCCI कडून मिळाला नाही. सध्या या प्राथमिक चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे.
टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विराटच्या जागी रोहितला वन डे आणि T20 चं कर्णधार करण्याची घोषणा होऊ शकते. विराट बॅटींगवर अधिक पोकस करण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे, असं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं दिलं आहे.
दरम्यान, रोहित शर्माला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्याने आपलं नेतृत्त्व सिद्ध केलं. IPL मध्येही त्याने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली होती. IPL मध्ये सर्वाधिक जेतेपदं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावावर आहे. मुंबईने रोहित च्या नेतृत्वाखाली तब्बल 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलाय.