औरंगाबाद – शहरातील राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांच्या 29 एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणलेले तब्बल 1 कोटी 16 लाख 80 हजार दोनशे रुपये एटीएम मध्ये न भरताच भरल्याचा बनाव केला. अधिकृतपणे पैसे भरल्याच्या नोंदीही केल्या. कंपनीने केलेल्या ऑडिटमध्ये पैशाचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे आठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
सिडको पोलीस ठाण्यात सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे उपशाखा अधिकारी रमेश साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कंपनी शहरातील विविध एटीएममध्ये बँकांकडून मिळालेल्या पैशाचा भरणा करते. या कंपनीकडे संबंधित बँकांच्या देशभरातील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम महिंद्रकर यांनी पाच मार्च रोजी ऑडिट केल्यानंतर त्यांनी 29 एटीएम मध्ये 1 कोटी 16 लाख 80 हजार 200 रुपये कमी असल्याचा अहवाल दिला. शहरात पैसे भरण्यासाठी कंपनीचे एकूण सात रूट आहेत. प्रत्येक रूटच्या व्यवस्थापनासाठी 2 एटीएम ऑफिसर, एक गनमॅन आणि चालक नेमलेले आहेत.
अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकाच वेळी सात रुटचा ऑडिट केले. तेव्हा रूट क्रमांक 4 वरील 7 एटीएम मध्ये 36 लाख 91 हजार 200 रुपये, 6 क्रमांकाचा रूट वरील 12 एटीएम मध्ये 38 लाख 86 हजार 800 रुपये आणि 7 क्रमांकाच्या रूट वरील 10 एटीएममध्ये 41 लाख 2 हजार 200 रुपये कमी असल्याचे आढळून आले.
आरोपींमध्ये योगेश पुंजाराम काजळकर, अनील अशोक कांबळे, अमित विश्वनाथ गंगावणे, सचिन एकनाथ रंधे, अविनाश ज्ञानेश्वर पडूळ, सिद्धांत रमाकांत हिवराळे या कर्मचाऱ्यांसह कंपनीचे शाखा अधिकारी बाबासाहेब शामराव अंभुरे आणि ऑडिटर संजय भालचंद्र जाधव यांचा समावेश आहे.