कोरेगाव | ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात सिंगापूर व मलेशिया येथे सहलीला नेतो, असे सांगून सुमारे 8 लाख 70 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतील 28 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबरनाथ (जि. ठाणे) येथील एका दांपत्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रीकांत सोनवणे व ललना सोनवणे (दोघेही रा. ल. खा. मानेनगर, कोंडूज, अंबरनाथ पश्चिम) या दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात विलास शंकर भोसले (रा. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, श्रीकांत व ललना हे दोघे 2019 मध्ये विलास भोसले व त्यांच्या मित्रांना भेटले होते. अंबरनाथ येथील ब्ल्यू वर्ल्ड हॉलिडेज कंपनीमार्फत ज्येष्ठ नागरिकांना स्वस्तात परदेशी सहल केली जाणार असल्याचे सांगितले. या दांपत्याने 20 ते 30 मे 2019 या कालावधीत कोरेगाव येथे ग्रुपच्या बैठका घेतल्या. सिंगापूर व मलेशिया येथे ज्येष्ठ नागरिकांना सवलत म्हणून पती, पत्नींना प्रत्येकी 65 हजारांमध्ये विमानाने नेऊन तेथे चांगल्या प्रकारची सेवा देणार असल्याचे सांगितले.
विलास भोसले यांच्यासह उत्तम सोनावले, सुरेश फणसे, सुशीला भोसले, मंगल जाधव, संगीता नलवडे, राम नलवडे, रामचंद्र कदम, ज्योत्स्ना कदम, कमल भोसले, प्रदीप येवले, प्रभावती येवले, संजय धुमाळ, रंजना धुमाळ (सर्व रा. कोरेगाव), राहुल जाधव (रा. पुसेगाव), शोभा इंगळे (रा. उंब्रज), मंजूषा जगदाळे (रा. लोणंद), शंकरराव चव्हाण, कल्पना चव्हाण (रा. सातारा), कृष्णाजी जाधव, पुष्पा जाधव (रा. वेळू), शिवाजी साळुंखे, शालन साळुंखे, मोहन बर्गे, सुलोचना बर्गे (रा. शिरढोण), रामचंद्र जाधव, रुक्मिणी जाधव (रा. अंबवडे) संमत कोरेगाव), चंद्रकांत पवार, सिंधू पवार यांचा समावेश फसवणूक झालेल्यामध्ये समावेश आहे. या सर्व 28 जणांनी अॅडव्हान्सपोटी 8 लाख 70 हजारांची रक्कम भरलेली होती. त्यावेळी करारनामाही केला आहे. त्यानंतर 17 ऑगस्टला मुंबई विमानतळावरून सहलीला जायचे आहे व उर्वरित रक्कम सहलीला गेल्यावर जमा करायची आहे, असे आम्हाला कळवले. त्या वेळी व त्यानंतरही सहलीला नेण्यास टाळाटाळ केली. अॅडव्हान्सपोटी दिलेली रकमेचे धनादेश दिले; परंतु खात्यावर शिल्लक नसल्यामुळे ते धनादेश न वटता परत आले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.