MPSC निवड रद्द झालेल्या ११८ सहायक मोटार वाहन निरिक्षकांना अतिरिक्त पदांवर नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आधी निवड करण्यात आलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना परिवहन विभागाने मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट क) पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. 31 मार्च, 2018 रोजी लोकसेवा आयोगाने या पदाकरिता 832 उमेदवारांची शासनास शिफारस केली. तथापि, दरम्यानच्या काळात सामान्य प्रशासन विभागाच्या 19 डिसेंबर, 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आणि समांतर आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी 08 ऑगस्ट, 2019 रोजी दिलेला निर्णयानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित निकाल ‍जाहीर केला. या निकालानुसार आयोगाने 11 सप्टेंबर, 2019 रोजी नव्याने 118 उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. त्याचवेळी आधीच्या निकालातील 118 उमेदवारांना यादीमधून वगळण्यात आले.

आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, 11 सप्टेंबर, 2019 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासनाकडे शिफारस केलेल्या सर्व 832 उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. याशिवाय या यादीमधून वगळण्यात आलेल्या 118 उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येईल.

न्यायालयाच्या निर्णयास अनुसरुन आणि नियमानुसार तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. गेली काही वर्षे हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना वगळणे योग्य होणार नाही अशी शासनाची भावना आहे. त्यामुळे शासन प्रथमच अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेत आहे, असे रावते यांनी सांगितले.


#MPSC मार्फत आधी निवड केलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावरील ११८ उमेदवारांना परिवहन विभागाचा मोठा दिलासा. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय – परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांची घोषणा pic.twitter.com/ZU3WTFmZIq

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 13, 2019

Leave a Comment