औरंगाबाद – महापालिकेने आजवर केलेल्या अँटिजन चाचण्यांपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांतून अधिक प्रमाणात पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीच अधिक विश्वासार्ह असल्याची माहिती औरंगाबाद पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी नुकतीच दिली. मार्च 2020 पासून ते आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेने दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यापैकी 91 हजार 932 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
औरंगाबादेत कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसर्या लाटेदरम्यान अधिकाधिक चाचण्या करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केला. यासाठी शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर चाचण्या सुरु करण्यात आल्या. बाहेर गावाहून येणार्या नागरिकांची एन्ट्री पॉइंटवर सक्तीने चाचणी आजही केली जात आहे. त्याशिवाय कोविड केअर सेंटर, रेल्वेस्टेशन, विमानतळ, सरकारी कार्यालये, खासगी व सरकारी दवाखाने आदी ठिकाणी कोरोना चाचण्या केल्या जात आहे. तथापि, पहिल्या व दुसर्या लाटेत जास्तीत जास्त चाचण्या करण्याचा प्रयत्न पालिकेने केल्याची माहिती पालिकेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी कोरोना चाचण्यांबद्दलचा अहवाल तयार केला आहे.
या अहवालानुसार मार्च 2020 पासून आतापर्यंत 10 लाख 12 हजार 807 नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. त्याच रॅपीड अँटिजन चाचण्यांची संख्या 5 लाख 99 हजार 489 इतकी असून आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 4 लाख 13 हजार 318 आहे. सिटी एन्ट्री पॉइंट, पब्लिक ट्रांसपोर्ट, शहरातील चाचणी केंद्र, सरकारी कार्यालये, कोविड केअर सेंटर्स, आरोग्य केंद्र, घाटी रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी लॅब या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात आल्याचा उल्लेख अहवालात आहे.
आरटीपीसीआरद्वारे 59 हजार पॉझिटिव्ह
शहरात आजवर 10 लाख 12 हजार 807 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून आजवर 91 हजार 932 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यात अॅन्टिजेन चाचण्यांच्या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्यांची संख्या 32 हजार 693 तर आरटीपीसीआर चाचण्यांमधून पॉझिटिव्ह निघालेल्यांची संख्या 59 हजार 239 एवढी नोंदली गेली आहे.