Saturday, February 4, 2023

राज्यात 6 जूनला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यासाठी नियमावली जारी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. आजही हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात सहा जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालय यांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.

‘शिवस्वराज्य दिना’ची काय आहे नियमावली

- Advertisement -

— भगवा स्वराज्य ध्वज, संहिता ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटिन असलेली भगवी जरी पताका असावी. हा ध्वज तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब या प्रमाणात असावा. म्हणजेच लांबी रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघ नखे या शिवरायांच्या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत असावा.
— शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सहिता शिवशक राज्य दंडाचे प्रतीक म्हणून कमीत कमी पंधरा फूट उंचीचा वाचा किंवा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान पाच ते सहा फुटाचा आधार द्यावा.

— 6 जून सकाळी नऊ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्य ध्वज बांधून घ्यावा. छत्रपती शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख-समृद्धी, समता या स्वातंत्र्याने भरली. म्हणून शिवशक राज्य दंडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्णकलश बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी हे अष्टगंधा ने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार गाठी, आंब्याची डहाळी बांधावी शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून सांगता करावी.
— सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्य गुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्य ध्वज व्यवस्थित घडी करून ठेवून द्यावा.