कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील सुपने येथे ‘भागवत’ नावच्या शिवारात उसाच्या शेतात वन्यप्राण्याची पाच पिल्ले आढळून आली. उसाची तोड सुरू असताना मजुरांना ही पिले आढळली. पिल्ले बिबट्याची असावीत, असा समज झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्राणी मित्रांसह वन विभागाच्या कर्मचाºयांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पिल्ले बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे स्पष्ट झाले. त्या पिलांना सुरक्षितस्थळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सुपने परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये अगोदरच भीतीचे वातावरण आहे. गावाच्या शिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. तसेच त्याने अनेक पाळीव प्राण्यांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. त्यातच भागवत नावाच्या शिवारात ऊसतोड सुरू असताना मजुरांना वन्यप्राण्यांची काही पिले आढळून आली. संबंधित पिले नवजात होती. त्यांचे डोळेही उघडले नव्हते. ही पिल्ले बिबट्याची असावीत, असा समज झाल्यामुळे मजुरांनी ऊसतोड बंद केली. तसेच सर्वजण तेथून निघून गेले.
बिबट्याची पिल्ले आढळल्याची अफवा पसरल्यामुळे गावात भीती आणखी वाढली होती. मात्र, ती पिल्ले रानमांजराची असल्याचे वन विभागाने पाहणीनंतर स्पष्ट केले. तसेच बिबट्या अथवा त्याची पिल्ले आढळल्यास ग्रामस्थांनी घाबरून न जाता वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले.