हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असून सर्वच पक्ष आणि नेतेमंडळी मतदारसंघांची चाचपणी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आमदार होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तसेच कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत ते सुद्धा सांगितलं आहे.
आज पुणे महानगरपालिकेतील हिरकणी कक्षाला रुपाली चाकणकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल कि, शरद पवारांनी सर्वसामान्य कुटुंबातील एका महिलेला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची आभारी आहे. पक्षाला मी खडकवासला मतदारसंघाबाबत याच्यापूर्वीच उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीचं या मतदारसंघातील काम मी आधीपासूनच सुरु केलं आहे. खडकवासला मतदार संघात फिरताना मला अनेक समस्या जाणवल्या आहेत. याचे नियोजन करणं गरजेचं आहे. असं रुपाली चाकणकर यांनी म्हंटल.
दरम्यान, राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत याबाबत रुपाली चाकणकर याना विचारलं असता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मिसिंग केसेस असतील त्याचबरोबर अँटी ह्यूमन ट्राफिक मध्ये अडकलेल्या केसेस असतील या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आम्ही गृह विभागाला दिलेला आहे. परंतु प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी आपल्या पोलीस प्रशासनाला घेऊन ती यंत्रणा राबवावी त्याचप्रमाणे गृहविभागाने सुद्धा त्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी रुपाली चाकणकर यांनी केली.