ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा म्हणजे ग्रामविकास- पालकमंत्री सतेज पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर 
ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा म्हणून आज ग्राम विकास यंत्रणेकडे पाहिले जात आहे. ही यंत्रणा अधिक गतीमान आणि सक्षम करुन ग्रामीण भागाचा विशेषत: गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सर्वानीच कटिबध्द होवू या! असा निर्धार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर येथे केला. ते जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. पोलीस परेड ग्राऊंड येथे क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनावेळी उदघाटक म्ह्णून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, खासदास धैर्यशिल माने, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील आदी जण उपस्थित होते.

महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर राज्य शासनाचा अधिक भर असून गावांना मोठा निधी आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. यानिधीचा योग्य पध्दतीने विनियोग करण्याच्या दृष्टीने पंचायत समिती स्तरावरही कुशल, तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची यंत्रणा निर्माण करणे गरजेचे असल्याचे सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना निश्चितपणे वाव मिळेल. या यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेची कामेही अधिक गतीमानतेने करावी, असे आवाहनही सतेज पाटील यांनी केले.

क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन क्रीडा स्पर्धेची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला दिपप्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण आणि क्रीडा ज्योत प्रज्वलनाने मंत्री महोदयांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मेन राजाराम हायस्कुलचे सहायक प्रा. बाबासाहेब माळवे यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. खेळाडूंच्या संचलनाने क्रीडा स्पर्धेची शान वाढवली. शेवटी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी आभार मानले. समारंभास विषय समित्यांचे तसेच पंचायत समित्यांचे सन्माननीय सभापती, खाते प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या आणि अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, धावणे, बॅडमिंटन, कॅरम, थाळी फेक, गोळा फेक अशा सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धामध्ये एकूण 2540 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.