कोरोनावर लस शोधणारा रशिया ठरला पहिला देश, परंतु..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीला रशियाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांनी ही घोषणा केली आहे. यानंतर कोरोनावर लस शोधणारा आता रशिया पहिला देश ठरला आहे. मात्र, रशियाच्या या कोरोना लशीवरून आता जागतिक आरोग्य संघटना आणि रशिया आमने सामने येण्याची चिन्हं दिसत आहेत.

रशियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांप्रमाणे चाचणी केली नाही. त्यामुळे ही लस धोकादायक ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच स्पष्ट केले आहे. रशियाने लस विकसित करताना, चाचणी करताना जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निर्देशांचे, सूचनांचे पालन केले नाही. कोणतीही लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत असेल हे धोकादायक असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले की, अनेकदा संशोधकांकडून लस विकसित झाल्याचा दावा करण्यात येतो. ही खरंतर आनंदाची बातमी असते. मात्र, लस प्रभावी असल्याचे संकेत मिळणे आणि क्लिनिकल चाचणीच्या सर्व टप्प्यांमधून लशीची चाचणी करणे यामध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

रशियातील गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केली लस
रशियाने तयार केलेली कोरोनाची लस मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. या लशीमध्ये असलेले पार्टिकल्स पुन्हा स्वत:ला रेप्लिकेट (कॉपी) करू शकत नाहीत. संशोधन आणि लस उत्पादनात सहभागी झालेल्या अनेकांनीही लस टोचून घेतली असल्याचे वृत्त आहे. ही लस घेतल्यानंतर ताप येण्याची शक्यता आहे. मात्र, ताप आल्यास पॅरासिटेमोलच्या गोळ्या घेण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. या लशीची नोंदणी करण्यात आल्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये ही लस सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करोनाला अटकाव करणारी ही लस गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमीलॉजी अॅण्ड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment