कोल्हापूर प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमधून जवळपास सर्वच लढतींचे चित्र आता हळू हळू स्पष्ट झाले आहे. अपेक्षेप्रमाणे राज्यातील अनेक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी देखील युतीला जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापुर दक्षिण मध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना आपला गड राखण्यात अपयश आले आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा पराभव करत ‘भाजपा’ला जोरदार धक्का दिला आहे. ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा तब्बल ४२,९६४ मतांनी पराभव करत सतेज पाटलांचे ‘आमचं ठरलंय आता दक्षिण उरलय ‘ खरं करून दाखवलं आहे.
आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच ऋतुराज पाटील मतांमध्ये आघाडी घेण्यात यशस्वी ठरले. याचा त्यांना फायदा झाला आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. दरम्यान महाडिक विरुद्ध पाटील अशा दोन घराण्यांमधील वादामुळे कोल्हापुरची निवडणूक दरवेळी गाजते. २०१९ लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सतेज पाटील यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडीक यांना पाडण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठींबा दिला.याबदल्यात विधानसभा निवडणुकांमध्ये आपले पुतणे ऋतुराज पाटील यांना तिकीट मिळवून देण्यात सतेज पाटील यशस्वी ठरले होते. विधानसभेसाठी सतेज पाटलांनी, ‘आमचं ठरलंय आता दक्षिण उरलं.’चा नारा दिला. कोल्हापूरात प्रचारादरम्यान ऋतुराज पाटलांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत अमल महाडिकांना चांगलंच आव्हान दिलं. ज्याचा फायदा ऋतुराज पाटलांना मतमोजणीत पहायला मिळाला. दरम्यान त्यांच्या विजयाने समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष सुरु केला आहे.