Satish Kaushik : ‘त्या’ 15 कोटी साठी सतीश कौशिक यांची हत्या? महिलेचं पोलिसांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. सतीश कौशिक यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप सतीश यांचा जवळचा मित्र असलेल्या विकास मालूची दुसरी पत्नी सान्वी मालूने केला आहे. १५ कोटी साठी माझ्याच पतीने सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा दावा सान्वी मालूने केला आहे. याप्रकरणी त्यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सतीशने तीन वर्षांपूर्वी विकासला गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते. परंतु विकासने ते पैसे सतीशला परत केले नाहीत. आणि जेव्हा सतीशने विकासाला हे पैसे परत मागितले तेव्हा त्याने कट रचून सतीशचा खून केला असा दावा सान्वीने केला आहे. काही गोळ्यांच्या आणि औषधांच्या मदतीनं कौशिक यांची हत्या केली असल्याचा आरोप तिने आपल्या पत्रात केला आहे.

sanvi malu

२३ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक आमच्या दुबईतील घरी आले होते. त्यांनी माझ्या पतीकडे १५ कोटी रुपयांची मागणी केली. मी तुला ३ वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये दिले होते ते आता मला परत दे, मला पैशांची गरज आहे असं सतीश माझ्या पतीला म्हणाले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. विकास मालूने भारतात आल्यावर सतीशचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.

जेव्हा सान्वीने विकासला या पैशाबाबत विचारलं तेव्हा आपण हे सगळे पैसे कोरोना काळात गमवल्याचे विकासने सांगितलं. आता त्याला पैसे कस परत करणार? याला आपल्या वाटेतून दूर केलं पाहिजे. त्यासाठी परदेशी मुलींची व्यवस्था करून त्याला औषधांचा ओव्हरडोज दिला जाणार असं विकास आपल्याला म्हणाला होता असा धक्कादायक खुलासा त्याच्या पत्नीने केलाय.

तिच्या पतीचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोपही सानवीने केला आहे. आता होळीच्या दिवशी विकासच्या फार्म हाऊसवर सतीशची तब्येत बिघडणे आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू हे सारे षड्यंत्र असल्याचे दिसते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे शाखा किंवा अन्य कोणत्याही एजन्सीकडे चौकशी करावी असं सान्वीने म्हंटल आहे. मात्र पोलिसानी या सर्व प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.