मुंबई । महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने सुमारे 8 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले असेल, मात्र त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. कंझ्युमर इंटेलिजेंस कंपनी ब्रँडवॉचच्या वार्षिक रिसर्चनुसार, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या वर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे. उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या सचिनने 50 प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये अमेरिकन अभिनेते ड्वेन जॉन्सन आणि लिओनार्डो डिकॅप्रियो आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यापेक्षा वरचे स्थान पटकावले आहे.
या लिस्टमध्ये अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर आहेत. या रिसर्चमध्ये तेंडुलकरचा या लिस्टमध्ये “वंचितांसाठी प्रशंसनीय कार्य, आवाज उठवणे आणि योग्य मोहिमांसाठी मार्ग दाखवणे, त्याचे प्रेरित चाहते त्याचे कार्य आणि त्याच्या भागीदार ब्रँड्सच्या संबंधित प्रभावशाली मोहिमेसाठी” याचा हवाला देत समावेश करण्यात आला आहे.
48 वर्षीय सचिनने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत, ज्यापैकी काही मोडणे अशक्य आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावली आहेत. भारताचा माजी कर्णधार तेंडुलकर, जो राज्यसभेचा सदस्य देखील आहे, एक दशकाहून अधिक काळ युनिसेफशी संबंधित आहे आणि 2013 मध्ये त्याला दक्षिण आशियाचा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. सचिन तेंडुलकरने ग्रामीण आणि शहरी भारतातील आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे.
सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 200 कसोटी, 463 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. याशिवाय 2006 मध्ये जोहान्सबर्गमध्ये एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने कसोटीत 15921 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या.