कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
त्याग, सदभाव, साधना हा मानवी जीवनाचा ठेवा असून त्याग आणि सदभावाचे साधु-संतांचे कार्य समाजाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने येथील भक्तीपूजानगरमध्ये तेरापंथ समुदायाचे 11 वे अधिशास्ता आचार्य महाश्रमण यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नागरिक अभिनंदन सोहळयात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. या सोहळ्यास महापौर निलोफर अजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या अहिंसा यात्रेतून सदभावना, नैतिकता आणि नशामुक्तीचा संदेश देवून समाजाला नवा विचार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. सर्वानी सदप्रवृत्ती आणि त्याग तसेच व्यसनमुक्तीचा विचार घेवून या यात्रेत सहभागी व्हावे. साधू-संतांचे सदप्रवृत्तीचे आणि नशामुक्तीचे सुरू केलेले कार्य समाज हिताचे महान कार्य असल्याचेही ते म्हणाले.
राज्यपाल म्हणाले, त्यागातून आणि साधनेतून नवा विचार आणि समाधान मिळते, त्यामुळे त्यागी पुरूषांचा समाजात सन्मान होत आहे. त्यांचे विचार समाजात आंगिकारले जात आहेत. महापुरूषांच्या सात्विक वाणीचा आणि विचारांचा समाजावर प्रभाव पडतो, या विचारातून समाज मन जीवंत व तेजस्वी राहिल, भारतीय संस्कृतीमध्ये त्यागाला अनन्य साधारण महत्व असून साधू-संतांनी असे जीवन जगून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. समाजानेही साधू-संतांचा सन्मान राखून त्यांच्या विचारांचा अंगिकार केला आहे, हिच भारताची विशेषत: म्हणावी लागेल. सदप्रवृत्ती ही समाजाला जीवंत ठेवणारी असून सदप्रवृत्ती आणि त्यागी जीवनाचा मार्ग साधू-संतांच्या विचारातून समाजाला मिळतो आहे. हा विचार सूर्य प्रकाशासारखा तेजस्वी प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वासही राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
त्यागी जीवन आणि सदमार्गावर चालणाऱ्या साधू-संतांचे विचार ऐकण्याची आणि त्यांच्या सहवास मिळण्याची संधी या कार्यक्रमामुळे उपलब्ध झाल्याबद्दल राज्यपाल महोदयांनी समाधान व्यक्त केले.आचार्य महाश्रमण यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, सदभावना, नैतिकता आणि नशामुक्तीचा विचार प्रत्येकाने जोपासणे समाज हिताचे आहे. संपूर्ण जीवन उच्च विचाराने जोपासून शांती आणि सदभावाचा मार्ग स्वीकारणेही तितकेच महत्वाचे आहे. माणसाने बाह्य आभूषणापेक्षा आंतरमन स्वच्छ ठेवून सत्य, स्वच्छ विचार याला महत्व द्यावे.
कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील यांचा शुभेच्छा संदेश वाचन करण्यात आला. याप्रसंगी महापौर निलोफर आजरेकर, कुमार श्रवणजी, साध्वी प्रमुखाक्षी, विजय कोराणे आदींनी विचार व्यक्त केले. प्रारंभी उत्तमचंद पगारिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभास उद्योजक सुरेश जैन, उपमहापौर संजय मोहिते, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक ललित गांधी, जयेश ओसवाल, राहुल चिकोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शितल मुळे-भामरे यांच्यासह अनेक मान्यवर, साधू-साध्वी आणि तेरापंथी समुदायाचे श्रावक उपस्थित होते.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.