सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या ट्वीटवरून सचिन तेंडुलकरसह अन्य सेलिब्रिटींना सल्ला देणाऱ्या शरद पवारांवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. सचिनला शेतीमधलं काही कळत नाही ते ठीक आहे. पण कधी क्रिकेट खेळले होते? कधी बॅटिंग केली होती? कधी बॉलिंग केली होती? तरीही ते अध्यक्ष झाले ना,’ असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना टोला लगावला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून सध्या सुरू घडामोडींवर सडेतोड मतं मांडली. जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भारतातील बऱ्याच सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी तिच्या विरोधात ट्वीट केले होते. यात सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. भारतातातील अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नका, अशा आशयाचं ट्विट सचिननं केलं होत. यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पवारांनी सेलिब्रिटींना इतर क्षेत्रांबद्दल जपून विधानं करण्याचा सल्ला दिला होता. याविषयी विचारलं असता सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.
”’पवार साहेबांनी सचिनच्या वक्तव्यावर मांडलेले मत ऐकून मला हसू आले. सचिनला शेतीमधलं काही कळत नाही ते ठीक आहे. पण पवार साहेब स्वत: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी कधी क्रिकेट खेळले होते? कधी बॅटिंग केली होती? कधी बॉलिंग केली होती? तरीही ते अध्यक्ष झाले ना,’ असा प्रतिप्रश्न खोत यांनी यावेळी केला.
”पवार साहेबांनी कधी लंगोट घालून कुस्ती खेळल्याचं मी तरी ऐकलं किंवा पाहिलं नाही. ते कधी हिंद केसरी झाले होते का, ही माहिती मी जुन्या लोकांकडून घेतली तर त्यांनीही नाही म्हणून सांगितले. लहानपणी नारळावरच्या कुस्त्या खेळले असतील ते सोडा. पण तरीही ते कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले ना,” असा चिमटा खोत यांनी काढला.
”मी सोडून बाकीच्यांना कळत नाही अशी कमी लेखण्याची पध्दत काही लोकांनी पाडली आहे. अनुभवातून दीर्घकाळ एखाद्या क्षेत्रात काम केल्यानंतर सर्वच अधिकार मला मिळाले आहेत. अशी मानसिकता राज्यात जी रूळत आहे. योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक,” असल्याचे सदाभाऊ खोत म्हणालेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.