हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल केलं आहे. गॅस सिलिंडर पासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने जनतेच्या खिशाला चाप बसत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना विचारलं असता त्यांनी मात्र महागाईचे समर्थन करताना अजब उदाहरणे दिली. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? असा अजब सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
चाळीसगावात शेतकऱ्यांच्या समस्या,अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा ही संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात आली . यावेळी त्यांनी महागाईच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हंटल की, इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचं धाडस करणार नाही. पण मी ते धाडस करतो. कुठे आहे महागाई?? देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग, महागाई नाही वाढली का? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का? असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळा झालं तरी लोक खरेदी करतात ना? तेव्हा महागाई दिसत नाही का ?? उलट कांदा डाळींच्या किंमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल. या महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावाही सदाभाऊंनी केला.