सांगली प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आगामी विधानसभा निवडणुकीत शड्डू ठोकणार असल्याचं समजत आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात खोत हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुक लढवणार असल्याचीही चर्चा आहे.
बारामतीप्रमाणे इस्लामपूर मतदार संघातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप जोरदार फिल्डींग लावत आहे. इस्लामपूरच्या जागेवर खुद्द सदाभाऊ खोत यांना आ.जयंत पाटील यांच्या विरोधात उतरविण्याची भाजपची रणनिती असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची याबाबत अनौपचारिक बैठक झाली असून बारामतीप्रमाणे इस्लामपुरात जयंतरावांना टक्कर देण्यासाठी भाजप सर्व आयुधे वापरणार आहे. खोत यांनी मतदार संघात केलेली विकासकामे व चळवळीच्या माध्यमातून बांधलेली मोट विधानसभेत उपयोगी पडू शकते.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे बैठक झाली. यामध्ये आगामी विधानसभा एकत्रित लढण्यावर बैठक झाली. घटक पक्षांना अठरा जागा देण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेलाही जागा मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांतीने विधानसभेसाठी मशागत करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.