हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सरकार मराठ्यांना आरक्षण देत नसल्यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्ट एक याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.
मध्यंतरी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्यांचे तोडफोड केल्याचा आरोप सदावर्ते यांनी लावला होता. यानंतर आज सदावर्ते यांनी थेट मराठा आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे समोर येत आहे. या याचिकेवर येत्या 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाईल. एकीकडे राज्यात मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतली असताना दुसरीकडे त्यांच्याच विरोधात आता याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे, मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी सदावर्ते यांनी हायकोर्टाकडे केली आहे. दरम्यान, राज्यात आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. गेल्या दोन दिवसात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे, तसेच लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, हिंगोलीत भाजप कार्यालय पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे. या सर्व प्रकारामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.