परभणी | गजानन घुम्बरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील महिन्यामध्ये शिर्डीकरांसोबत बैठक घेत साईबाबा जन्मस्थान वादाबाबत मध्यस्थाची भूमिका घेतली होती . मुंबईतील बैठकीनंतर शिर्डीकरांचे समाधान झाले परंतु यावेळी त्यांनी पाथरीकरांना बैठकीसाठी आमंत्रण न देता, पाथरीकरांना तीर्थक्षेत्र विकास म्हणून पाथरी चा विकास करा असा सल्ला दिला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर नाराज होत, श्री साईबाबा जन्मस्थान स्मारक समितीने या संदर्भात साई जन्मभूमीचे पुरावे घेऊन औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्याचे ठरवले होते.
मध्यंतरी काहीदिवस जन्मभूमीचा वाद शांत झाल्याचे वाटत होते ,परंतु आज जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी सुमारे दहा हजार साईभक्तांना सोबत घेत, साईबाबांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांचे सेलू येथील मंदिर ते साई जन्मभूमी पाथरी अशी सत्तावीस किलोमीटर पायी दिंडी काढली. हि दिंडी काढण्यामागे साईबाबांचे जन्मस्थान पाथरी हेच असून या गोष्टीला समर्थन देण्यासाठी व पाथरी शहराचे नाव बदलून ते साईधाम करण्यासाठी त्यांनी या पायी दिंडीचे आयोजन केले होते असे प्रसारमाध्यमांशी आमदार बोर्डीकर यांनी बोलताना सांगितले.
भाजपा आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की ,पाथरी साईबाबांचे जन्मस्थान असून त्याबाबत साई भक्तांकडे पक्के पुरावे आहेत. त्यामुळे येथे विरोध व विवादाचा विषय येत नाही या पलीकडे जात, पाथरी साईच्या जन्माने पावन झाली असल्याने आता शहराचे नामकरण साईधाम करावे अशीही आता आमची शासनाकडे मागणी आहे.
दरम्यान सुमारे दहा हजार साईभक्तांनी आज साईबाबांचे दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसर साई भक्तांनी फुलून गेला होता. यावेळी पाथरीकर यांनी गुरु भूमीतून आलेल्या साई भक्तांचे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले . यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी काढत परिसर सजविण्यात आला होता. आलेल्या दिंडीमध्ये रथ घोडे बैलगाडी व वारकरी संप्रदायातील टाळ मृदंग यांनी भक्तिमय वातावरण तयार केले होते. सकाळी सात वाजता सेलु शहरातुन निघालेल्या यात्रेचे आगमन पाथरी शहरात दुपारी चार वाजता झाले होते. यावेळी श्री साईबाबा जन्मभूमी स्मारक समितीचे विश्वस्त व कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी या सर्व साईभक्तांचे उपस्थित राहात स्वागत केले.