मुंबई । देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत कोणाही नागरिकाला घराबाहेर विनाकारण पडण्यास मनाई आहे. कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. जनतेने लॉकडाऊनचे पालन करावे अशी सरकारची यावेळी माफक अपेक्षा आहे. जनता सरकारचा शब्द पाळत आहे. असे असताना सलमान खानच्या वडिलांना घराबाहेर फिरण्याची परवानगी कशी दिली जाते? असा प्रश्न वांद्रे येथील स्थानिकांनी उपस्थित केला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सलमानचे वडिल सलीम खान दररोज आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला जातात. सकाळी साडे ८ ते ९ वाजेपर्यंत ते घराबाहेर फिरत असतात.
अशा वेळी जर नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तर पोलीस प्रशासन सलमानच्या वडिलांवर कारवाई का करत नाही? की केवळ ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना लॉकडाउनचे नियम लागू होत नाहीत? असा प्रश्न वांद्रे येथील स्थानिकांनी सरकारला विचारला आहे.
या आरोपांवर सलीन खान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मला पाठ दुखीचा त्रास आहे. डॉक्टरांनीच मला दररोज चालण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या ४० वर्षांपासून मी दररोज चालत आहे. अचानक जर मी चालणं बंद केलं तर माझा त्रास वाढेल. त्यामुळे विशेष काळजी घेऊनच केवळ अर्ध्या तासासाठी मी घराबाहेर पडतो.” दरम्यान या प्रकरणावर अद्याप प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.