हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेना आणि भाजपने आपला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आमदारांचे मत यावेळी महत्त्वपूर्ण असून लहान लहान पक्ष आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्याच दरम्यान, समाजवादी पक्षाने आपली दोन्ही मते महाविकास आघाडीला देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची विजयाची वाट सुकर दिसत आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर याबाबत माहिती देताना म्हंटल की, अखिलेश यांनी आम्हाला महाविकास आघाडीला मत देण्यास सांगितलं आहे. त्यामुळं आम्ही महाविकास आघाडीला मत देणार आहोत. समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक बैठक झाली. त्यामुळे आता समाजवादी पक्षाची दोन्ही मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देणार आहोत अस अबू आझमी यांनी म्हंटल.
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 12 एवढे आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामध्ये भाजप 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार त्यांच्या सोबतीला आहेत.