कुत्र्यांपासून बचावासाठी सांबर थेट छतावरून घरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वन्य क्षेत्रात अनेक प्राणी मुक्तपणे संचार करताना पहायला मिळतात. येथील स्थानिक लोकांसह पर्यटकही त्यांना दररोज पाहतात. मात्र, या वन्य प्राण्यातील एक सांबर पळता पळता थेट घरातच शिरल्याचा प्रकार घडला. महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले-बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसलळे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास
येथील वन्य क्षेत्रात एक सांबर फिरत असताना त्याच्या पाठीमागे कुत्री लागली. यावेळी कुत्र्याने केलेल्या पाठलागामुळे घाबरलेले सांबर बचावासाठी हरोशी येथील गणपत कोंडीबा उतेकर यांच्या घराबाजूला असलेल्या दरीवरून घराच्या पत्र्यावर चढले. सांबराच्या वजनाने सिमेंटचा पत्रा तुटल्याने ते सांबर थेट घरामध्ये कोसळले. उंचावरून पडल्‍याने ते जखमी झाले.

या सांबराच्या पायास दुखापत झाल्याने ते उभे राहू शकत नव्हते. अचानक आलेल्या या पाहुण्यास पाहून उतेकर परिवार काहीसा घाबरला. मात्र, या घटनेची माहिती तातडीने वनविभाग वनरक्षक बजरंग वडकर, वनमजूर गणेश वागदरे यांना दिली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पुणे रेस्क्यू टीमला जखमी सांबारा बाबतची माहिती कळविली. सायंकाळी रेस्क्यू टीम सह्याद्री प्रोटेक्टर प्राणीमित्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या जखमी सांबारास विशेष वाहनाने उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आले.