सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय कलगीतुरा बंद करून आधी शेतकऱ्याला मदत करा – छत्रपती संभाजीराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी आली असून शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे. राज्यातील बळीराजा कोलमडला असून त्याला धीर देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांना आरोप प्रत्यारोप करत आहेत. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. तर विरोधी पक्ष केंद्राकडून मदत येईपर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी करत आहे. महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सुरु असलेल्या या कलगीतुऱ्यावर भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर दोघांना सल्ला दिला आहे.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करुन शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवावी. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरुर करा. पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना काय आदेश दिले होते, याबाबत माहिती आहे. ते वाचून तरी सत्ताधारी आणि विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी भागाचा दौरा केला असून मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे तुमचं समाधान होईल अशी मदत तुम्हाला केली जाईल. तुमचं आयुष्य उभं करण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. तुमच्या सुखा समाधानासाठी जे जे करता येईल, ते मी करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment